पंढरपूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. जिल्ह्यातील अनेक जागांवर आरक्षण तर महिलांसाठी राखीव झाला. तर काही ठिकाणी इच्छुकांच्या मनाजोगती जागा सुटल्याने चुरस वाढणार आहे. मात्र आता गावखेड्यातील चावडीवर आता राजकीय खलबते रंगणार आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसी साठी राखीव झाले आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले आहे. या मध्ये अनुसूचित जागेसाठी ५ आणि महिलांसाठी ५ ठिकाणी आरक्षण जाहीर झाले.अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी १ जागा सोडण्यात आली आहे. नागरीकांचा मागस प्रवर्गासाठी ९ आणि महिलांसाठी ९ तर सर्वसाधारण साठी २० आणि महिलांसाठी १९ असे ६८ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक इच्छुक दिग्जाना धक्का बसला आहे. करमाळा तालुक्यात महिलांसाठी राखीव जागा झाल्याने अनेक नाराज तर पत्नीला उभे केले जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार संजय शिंदे यांचा पारंपारिक कुर्डू हा मतदार संघ सर्वसाधारण झाल्याने या ठिकाणी त्यांचे चिरंजीव निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

तर मोहोळ तालुक्यात माजी सभापती विजयराज डोंगरे ,माजी सदस्य,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे मतदारसंघ सर्वसाधरण झाल्याने हे दोघे पुन्हा निवडणूक लढणार का या कडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. तर गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणारे बळीरामकाका साठे यांचा पारंपारिक गट हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे साठे यांची राजकीय अडचण निर्माण झाली आहे.जिल्ह्यात या पूर्वी मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र मध्यंतरी राजकीय चित्र बदलल्याने मोहिते पाटील मागे पडले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा,विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी चुणूक दाखवली. तर दुसरीकडे भाजपा, शिंदे गट,अजित पवार गट हे देखील आता गाव पातळीवर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने सर्व ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त आहे.त्यामुळे राजकीय पक्षाची चांगलीच दमछाक होणार आहे. असे असले तरी आता गावखेड्यातील चावडी वर राजकीय खलबते, आखाडे रंगणार आहेत.

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण

अक्कलकोट- ना. मा. प्र. महिला, बार्शी -सर्वसाधारण महिला, सांगोला -सर्वसाधारण महिला, करमाळा – ना. मा. प्र. महिला, माढा -सर्वसाधारण, पंढरपूर -अनुसूचित जाती सर्वसाधारण, माळशिरस- सर्वसाधारण, मंगळवेढा -सर्वसाधारण महिला, मोहोळ – ना मा प्र सर्वसाधारण, दक्षिण सोलापूर -सर्वसाधारण, उत्तर सोलापूर -अनुसूचित जाती (महिला)