scorecardresearch

“हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे, अजित पवार…”; अल्टिमेटमवरुन एसटी कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंबंधी कठोर निर्णय घेण्याचे संकेत अजित पवार यांनी आज दिले.

st strike Ajit Pawar
अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर एसटी कर्मचाऱ्यांचं उत्तर (फाइल फोटो)

महाराष्ट्र सरकारने संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मुदतीचा आज अंतिम दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. मात्र नेत्यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर मुंबईमधील आझाद मैदानामध्ये आंदोलन करत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> “…तर अजित पवारांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी”

एकीकडे अनिल परब सांगतायत की कारवाई होणार नाही कामावर रुजू व्हा, दुसरीकडे अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिलाय, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळावरच निशाणा साधला.

“आताचे मंत्रिमंडळ विदूषकांचे मंत्रिमंडळ झालेले आहे. अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ३१ तारखेपर्यंत कामावर न परतल्यास कठोर कारवाई करू अशा धमक्या देत होते. तितक्यात एका पत्रकाराने त्यांना, उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पाच तारखेपर्यंत मूभा दिलेली आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचंय असे विचारले असता अजित पवार गोंधळून गेले. मग म्हणाले, पाच एप्रिलपर्यंत माझा अल्टिमेटम वाढवतो. आज या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला न्यायालयाने किती अल्टिमेटम दिलेलं आहे याची जर यांना माहिती नसेल तर ते काय मंत्रिमंडळ चालवतात, काय महाराष्ट्र चालवतात?,” असा प्रश्न मुंबईतील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी विचारलाय.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
एसटीच्या संपासंदर्भात आज पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंबंधी कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. “३१ तारखेपर्यंत सगळ्यांना संधी द्या असं सांगण्यात आलं होतं. उद्यापासून कठोर निर्णय घेतला जाणार आहे अशी शक्यता आहे. उद्या वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलं आहे त्यांच्या जागी नवीन भरती होऊ शकते,” असा इशारा अजित पवारांनी दिला.

“समितीचा जो रिपोर्ट आला त्यातही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच अंशी पूर्ण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. पगारही पूर्वीच्या तुलनेच बऱ्यापैकी वाढवले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने दिलेली मुदत संपली तर कठोर कारवाईचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St workers protest workers says ajit pawar dont know the dates and time given by court scsg

ताज्या बातम्या