Sudhir Mungantiwar On Raj Thackeray and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण सुरु आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार असल्यामुळे या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

यावर आता अनेकांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. मात्र, या मेळाव्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आवश्यक असेल तर दोन्ही पक्षाचा एकच पक्ष करावा’, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मराठीच्या विषयावर कोणतंही राजकारण झालेलं नाही. मात्र, तरीही हा गैरसमज का पसरवला हे माझ्या लक्षात येत नाही. प्रश्न हा होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा पाचवीपासून सक्तीची आहे, तर पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी सक्तीची आहे. मग बाल वयामध्ये तिसरी भाषा देखील सहज शिकता येते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली होती की मराठी आणि इंग्रजी बरोबर पहिलीपासूनच हिंदी शिकवली तर सहज शिकता येईल. मग यामध्ये मराठीच्या राजकारणाचा विषय कुठे येतो. मराठी अनिवार्य आहे आणि राहील”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसांनी इंग्रजी शिकणं हा अभिमान, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान? हे मला अद्याप समजलेलं नाही. कदाचित आणखी ५० ते १०० पुस्तके वाचल्यावर ते लक्षात येईल. काँग्रेसने सांगितलं की ठाकरे बंधू दोघे एकत्र आले तर आपण त्यांच्याबरोबर जायचं नाही. या मुद्यांचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणात कारण नसताना गैरसमज का पसरवले जात आहेत? आज दोन्ही बंधू मेळाव्यात येकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आवश्यक असेल तर दोन्ही पक्षाचा एकच पक्ष करावा”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.