छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडणीसाठी आता काेयता न वापरता संपूर्ण प्रक्रियाच यंत्राच्या आधारे करण्याचा कल वाढविण्यात येत आहे. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात येत्या हंगामात ८० हार्वेस्टरच्या आधारे तोडणी होणार आहे. ऊसतोडणी मुकादमाकडून अग्रीम घेतल्यानंतरही वेळवर पुरेसा मजूर उपलब्ध करून दिला जात नाही. परिणामी यांत्रिकीकरणाकडे कल वाढला असून मराठवाड्यातील काही कारखान्याने यावर्षी ५० टक्के तोडणी यंत्राच्या साहाय्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्वेस्टर खरेदीसाठी राज्य सरकारकडून ३५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. यातून २६३ यंत्र खरेदी करण्यात आलेली आहेत. ८८ कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला आहे.

मजुराने एक टन ऊसतोडणी केली तर ३६६ रुपये लागतात. तर यंत्राच्या साहाय्याने ४५० ते ५०० रुपयांचा खर्च होतो. यंत्राच्या साहाय्याने कामाचा वेळ कमी होत असल्याने तोडणीच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करणे आवश्यक बनले असल्याचे मांजरा परिवाराचे प्रमुख आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, जगात आता कोठेही तोडणीसाठी मनुष्यबळाचा उपयोग होत नाही. ही प्रक्रियाच यंत्राने होते.

जरी सध्या दर जास्त असले तरी तो स्थिरावेल. त्यामुळेच मांजरा परिवारातील अन्य साखर कारखान्यातील ८९ टक्के तोडणी यंत्राच्या आधारे केली जात आहे. रांजणी कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, तोडणी मजूर शेतकऱ्यांनाही बऱ्याचदा त्रास देतात. अधिकची रक्कम मागतात. मुकादम करार करून अग्रीम रक्कम उचलतात आणि मजूरच पोहोचवत नाही.

अनेक कारखान्यांबरोबर करार केल्याने वेळेवर मजूर मिळणे अवघड होते. त्यामुळे आता यंत्राच्या साहाय्याने ऊसतोडणीचा कल वाढला आहे. नॅचरल शुगर साखर कारखान्याच्या परिसरात ४० टक्क्यांपर्यंत ही प्रक्रिया आता विस्तारत नेण्यात आली आहे. जयप्रकाश दांडेगावकरांनीही हार्वेस्टर वाढत असल्याचे सांगितले. हार्वेस्टर हे यंत्र ९० लाख रुपयांपर्यंत असल्याने त्यास अनुदानाची योजनाही मंजूर करण्यात आली आहे.

आतापर्यंत या योजनेतून ८८ कोटी ८७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आणखी २३२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर असून पुढील वर्षातही यंत्र वाढतील, असे राज्य साखर आयुक्तालयातील सूत्रांना वाटते आहे. साखर कारखान्यांच्या पुढील दीड- दोन महिन्यात सुरू होणाऱ्या हंगामात आता कोयता वजा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकट्या बीड जिल्ह्यात सहा लाखांपेक्षा अधिक मजूर आहेत.

  • हार्वेस्टरने ऊसतोडणी केल्यास आणि यंत्र चालविणाऱ्याचे कौशल्य अधिक असेल तर १५० ते १६० टनापर्यंत तोडणी होते.
  • मजुराच्या जोडीने दिवसभरात दीड टन ऊसतोडणी होते. यामध्ये ऊस तोडणे, तो स्वच्छ करणे आणि त्याची मोळी बांधणी आदी कामे केली जातात.
    कोट

‘‘आता जगात कोठेही मजुराच्या साहाय्याने ऊसतोडणी होत नाही. यंत्रच वापरली जातात. मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांमध्ये आता तोडणी यंत्राच्या साहाय्याने करण्याचे ठरवले आहे. – अमित देशमुख, आमदार, लातूर.