बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. एकीकडे बारामतीमध्ये आज दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करत असताना त्याआधी दोन्ही बाजूंनी झालेली टीका-टिप्पणी चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे अजित पवारांनी बारामतीच्या विद्यमान खासदार अर्थात सुप्रिया सुळेंवर विकासनिधीच्या बाबतीत टीका केली असताना आता सुप्रिया सुळेंनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

बारामतीची लढाई अधिक आव्हानात्मक झाली?

घरातल्याच उमेवार सुनेत्रा पवार यांच्यामुळे बारामतीतलं आव्हान अधिक खडतर झालंय का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला असता त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. “ही माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाहीये. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यामुळे समोर कोण लढतंय, याचा मी फारसा विचार करतच नाही. मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. माझ्यावर हे संस्कारच नाहीयेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांचं ‘ते’ विधान!

दरम्यान, अजित पवारांनी बारामतीमध्ये “आमच्या नावासमोरची बटणं कचाकच दाबा, म्हणजे तुम्हाला विकासनिधी द्यायला आम्हालाही बरं वाटेल, नाहीतर आम्ही हात आखडता घेऊ”, असं मिश्किल विधान केलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, “यावर माझं एकच उत्तर, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी”!

“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”

“…तर अजित पवारही मला मतदान करतील”

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतरही अजित पवार आपल्याला मतदान करतील, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे. “विद्यमान खासदारांनी बारामतीमध्ये विकासनिधी आणला नाही”, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा. मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर उद्या सकाळी ते मेरीटवर मलाच मतदान करतील”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानते की…”

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला आहे. “शरद पवारही आमच्याकडे येणार होते पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला”, असा दावा फडणवीसांनी केला आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. “मी देवेंद्र फडणवीसांचे मन:पूर्वक आभार मानते. ते एक गोष्ट कबूल करतात. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता. ते खरं बोलले यासाठी मी त्यांचे आभार मानते”, असं त्या म्हणाल्या.