घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना १०० कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर गुलाबराव देवकर यांनाही मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला आहे. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. प्रत्येकाचा घोटाळ्यात जो काही सहभाग होता त्यानुसार कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. धुळे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या घोटाळा प्रकरणी तारीख पे तारीख पडत होती. मात्र आज अखेर या प्रकरणी ४८ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच सुरेशदादा जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चंद्रकांत सोनावणे हे आमदारही या घोटाळ्यात गुंतलेले होते. त्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून घरकुल घोटाळ्याचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. या प्रकरणी धुळे न्यायालयाने आज निर्णय देत एकूण ४८ जणांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत दहा वेळा निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज अखेर याप्रकरणी सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली.

सुरेश जैन यांनी चार वर्षे दहा महिन्यांचा कालवाधी कारागृहात घालवला आहे. त्यामुळे त्यांच्या सात वर्षांच्या शिक्षेतून हा कालवाधी कमी होणार आहे. मात्र उर्वरित शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. तसेच गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

अंजली दमानिया म्हणतात..

” अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय धुळे न्यायालयाने घरकुल घोटाळा प्रकरणात दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात जो लढा दिला त्या लढ्याला कुठे तरी यश आल्याचं या निकालामुळे दिसतं आहे.  भ्रष्टाचार हा एके काळी खेळ होतो आहे की काय असं वाटत होतं मात्र या प्रकरणात १८ वर्षांनी का होईना निकाल लागला आहे. दोषींना कारवासाची शिक्षा झाली हे महत्त्वाचे आहेच मात्र सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे सुरेश जैन यांना ठोठावण्यात आलेला १०० कोटींचा दंड. सुरेशदादा जैन हे वयोवृद्ध आहेत आणि त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांतर्फे करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने हे म्हणणे मान्य न करता योग्य ती कारवाई केली आहे. अण्णा हजारे यांच्या लढ्याला आलेलं हे यश आहे असंच मी म्हणेन. ”

 

काय आहे घरकुल घोटाळा ?

घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.

मात्र २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही. तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

दरम्यान याच काळात जळगाव नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देण्यात आली. या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांचा समावेश आहे.