नांदेड : आधुनिक मराठवाड्याचे शिल्पकार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या यंदाच्या १०६ व्या जयंती (१४ जुलै) वर्षातच त्यांनी मोठ्या राजकीय संघर्षातून; पण नेटाने साकारलेल्या जायकवाडी धरणाच्या भूमिपूजनाच्या हीरकमहोत्सवी वर्षाचा योग जुळून येत आहे.
मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी ‘जायकवाडी’ची ओळख असून, पैठण गावाजवळच्या या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते तसेच तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आदींच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाले होते. शंकरराव तेव्हा राज्याचे पाटबंधारे मंत्री होते.
शंकररावांचा कणखरपणा आणि तेव्हा अतिमागास असलेल्या मराठवाडा विभागाचे हित जपण्याचे त्यांचे धोरण हे सारे जायकवाडी धरणाच्या निर्मितीच्या निमित्ताने ठळक झाले. तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. राव यांना जायकवाडीची मंजुरी मिळविण्यात शंकरराव यशस्वी झाले होते.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत, पाणीप्रश्न आणि त्यावरून झालेल्या राजकारणाचे अभ्यासक डॉ. सुधीर भोंगळे यांच्यासह काही अभियंत्यांच्या पुस्तकांमध्ये जायकवाडीची कहाणी सांगण्यात आली आहे. राज्य निर्मितीपूर्वी हे धरण माजलगाव तालुक्यात ‘जायकुचीवाडी’ येथे प्रस्तावित होते. पण राज्य पुनर्रचनेनंतर पैठणची निवड करण्यात आली. १९५६ ते १९६५ या कालखंडात या धरणासंबंधाने अनेक घडामोडी झाल्या.
पाटबंधारे खात्यातील माजी मुख्य अभियंता गो. वि. अभंगे यांच्या नोंदीनुसार, गोदावरी नदीवरील प्रकल्पाची संकल्पना दिवंगत रामचंद्रराव कसबेकर यांची होती. नंतरच्या काळात नारायणराव चेरेकर यांनी वरील प्रकल्पास मूर्त स्वरूप दिले. खुद्द शंकररावांनी खूप नंतरच्या एका मुलाखतीत चेरेकर यांच्या योगदानाचा ‘धरणासाठी जागा तपासण्याच्या कामातील निष्णात माणूस’ अशा शब्दांत उल्लेख केला होता.
या धरणावरून विधिमंडळाच्या सभागृहात आणि बाहेरही आरोप-प्रत्यारोप झाले. तो सबंध काळ शंकररावांसाठी कसोटीचा, ताणतणावाचा होता. आरोप आणि आक्षेपांना त्यांनी उत्तरेही दिली. त्यांच्यावर आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनाही करता आला नाही. याच काळात त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्नही झाला होता. धरणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले तेव्हा शंकरराव मुख्यमंत्री होते.
उद्दिष्टपूर्ती झालीच नाही !
पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा. विजय दिवाण हे जायकवाडी धरणाचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. ते म्हणतात की, धरणाच्या प्रकल्प अहवालात २ लाख ७२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे तेव्हा नमूद होते. पण १९७६ साली धरण बांधून पूर्ण झाले तेव्हा सिंचनक्षेत्र १ लाख ४२ हजार हेक्टर असेल, असे जाहीर करण्यात आले. या धरणातून आजवर उद्दिष्टपूर्ती झालीच नाही.