छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डाॅ. हेमलता ठाकरे यांना बुधवारी बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी तातडीने पत्रकार बैठक घेऊन काही खुलासे केले. डाॅ. ठाकरे यांच्या कारभाराविषयीच्या तक्रारी, विभागीय चौकशी लावल्याची आणि पोलीस आयुक्त, राज्यपालांकडेही केलेल्या तक्रारींची जंत्री कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी या वेळी सादर केली.
दरम्यान, तत्पूर्वी बुधवारच्या घटनेवरून गुरुवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्यार्थी संघटनांनी डाॅ. ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि कुलगुरू, कुलसचिव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. या वेळी पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. अखेर सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तर विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही डाॅ. ठाकरे यांच्याशी संबंधित विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला होता.
कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकार बैठकीत डाॅ. हेमलता ठाकरे यांचा कारभार आणि कार्यालयीन वर्तनाची एक चित्रफित दाखवली. त्यात उपकुलसचिव डाॅ. ठाकरे या आक्रमक झाल्याचे दाखवण्यात आले. तक्रार करणे हा त्यांचा स्वभाव झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांनी केलेला अधिकाराचा गैरवापर, कुलसचिवांच्या बनावट स्वाक्षऱ्या, विद्यापीठ अनुदान आयोगाला मराठीत लिहिलेले पत्र, विद्यापीठ प्रशासनाने डाॅ. ठाकरे यांना बजावलेल्या नोटिशी आणि त्यावर त्यांचे असमाधानकारक उत्तर आदींची माहिती दिली.
डाॅ. ठाकरे यांची विभागीय चौकशी सुरू केल्यानेच त्या बिथरल्या असून, त्यातूनच त्यांनी कुलगुरू, कुलसचिवांविरुद्ध तक्रारी करण्याचा मार्ग अवलंबला. त्यात कसलेही तथ्य नसल्याचे डाॅ. अमृतकर या वेळी म्हणाले. डाॅ. ठाकरे यांनी आमच्या तक्रारी करण्यापूर्वीच आम्हीही त्यांची पोलीस आयुक्त, कुलपतींकडे तक्रार केली. राज्यपाल भवनाकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आल्यानंतर द्विसदस्यीय समिती स्थापन केली. त्यानंतर निवृत्त जिल्हा न्यायाधीश पी. एस. परांजपे यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही डाॅ. अमृतकर यांनी सांगितले.
डाॅ. हेमलता ठाकरे यांनी कुलगुरू, कुलसचिवांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाणे, सिटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन सहायक पोलीस आयुक्तांसह राष्ट्रीय महिला आयोग, अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडेही तक्रार केल्याकडे लक्ष वेधले असता कुलसचिव डाॅ. अमृतकर यांनी डाॅ. ठाकरे या स्त्री असण्याचे आणि विशिष्ट समुदायातील असल्याचे भांडवल करत असल्याचे उत्तर दिले.
बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या डाॅ. हेमलता ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. मात्र, अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. डाॅक्टरांशी चर्चा करूनच त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल. विद्यापीठात परवानगी न घेता आंदोलन, घोषणाबाजी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना नंतर सोडून देण्यात आले.- मंगेश जगताप,पोलीस निरीक्षक