लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे नव्या सुविधांसाठी जागा उपलब्ध नाही. प्रवेश क्षमतांचा ५० जागांचा तिढा कायम आहे. रेल्वेकडून साडेपाच एकर जागा महाविद्यालयासाठी घेतली. पण रेल्वेने जागा देण्यास नकार देत जागेचा विषय पुन्हा न्यायालयात नेला आहे. रिक्त जागांचा प्रश्न तर कायमच असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडचणींचा गुंता सुटता सुटेना अशी स्थिती आहे.

लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी कागदोपत्री ४२ एकर जागा असली तरी प्रत्यक्षात नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मोकळी जागा नाही. महाविद्यालय मंजूर झाले २००३ मध्ये. दीडशे जागांची क्षमता. विलासराव देशमुख यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला. मात्र, रेल्वेकडून मिळणाऱ्या जागेसाठी अडचणी वाढत राहिल्या. २०१९ मध्ये केंद्र सरकारने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना ५० जागा आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी देऊ केल्या होत्या. त्याच कालावधीत लातूरला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची तपासणीचे पथक आले. या पथकाने अनेक त्रुटी काढून दीडशे जागांच्या पैकी ५० जागा कमी केल्या. त्यामुळे प्रवेश क्षमता झाली शंभर. अतिरिक्त ५० जागा दिल्या जताील असे सांगण्यात आले होते. ते तर आश्वासन विरले. आता जागा वाढल्या तर वर्ग उपलब्ध होणार नाहीत. कारण बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.