दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : अल्पमुदतीत भरघोस परतावा देण्याची लालूच दाखवत शेकडो कोटींची गुंतवणुकदारांना चुना लावण्याचा प्रकार गेली कित्येक महिने सुरू आहे. तक्रारीनंतर आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक सध्या तरी दोन-चार कोटींची समोर येत असली तरी शेकडो कोटींना गंडा घालण्यात आला आहे. याची व्याप्ती पाहता गुंतवणूकदारांना नजीकच्या काळात मूळ रक्कम परत मिळतील याची खात्री सद्य:स्थितीत देता येणे कठीण आहे.

कोणतीही बँक वार्षिक ७ ते ८ टक्क्यांवर परतावा देऊ शकत नाही. मात्र शेअर बाजारात पैसे गुंतविले तर त्याचे मासिक १५ टक्क्यांपर्यंत म्हणजे सात महिन्यांत दामदुप्पट परतफेड मिळणार असल्याची लालूच दाखविण्यात आली. एस. एम. ग्लोबल, स्मार्ट ट्रेड, ट्रेड प्लॅनेट अशा कंपन्या सांगलीवाडीतील मिलिंद गाडवे याने तर जत तालुक्यातील गोंधळेवाडीचा ज्ञानेश्वर हिप्परकर याने वेफा मल्टीट्रेड या नावाने कंपनी सुरू करून हा गंडा घातला आहे. महिन्याला १५ टक्के परतावा आणि मूळ रक्कम मागेल त्या वेळी परत देण्याची तयारी या कंपनीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी शहरात कंपनीची कार्यालयेही सुरू करण्यात आली. प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे परतावाही देण्यात आला. मात्र जसजसा विस्तार होऊ लागला तसतशी दिरंगाई होत गेली. गुंतवणूक केलेली रक्कम तरी परत करा असा गुंतवणूकदारांचा आग्रह सुरू होताच, भामटय़ांनी पोबारा केला होता.

गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने या मंडळींचे फावले आहे. सरकारी नोकरदार, ठेकेदार हे तर गुंतविण्यात आघाडीवर असले तरी काही शेतकरीही यामध्ये अडकले आहेत. उत्पन्नाचा स्रोत सांगण्याची गरज भासत नसल्याने यामध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येणार नाहीत असेच सावज या भामटय़ांनी शोधले आहे. कारण एवढी मोठी रक्कम कोठून आली याची विचारणा तक्रार देत असताना होणार आणि ते सांगता येणार नाही यामुळे भ्रष्ट मार्गाने मिळविलेले पैसे या योजनांमध्ये गुंतविण्यात काही मंडळी आघाडीवर आहेत. यामुळेच शेकडो कोटींची फसवणूक असली तरी तक्रारी मात्र किरकोळ स्वरूपातच असणार आहेत. काहींनी जमिनी विकून तर काही जणांनी आयुष्याची कमाई यामध्ये गुंतवली आहे. महामार्ग गेल्याने जमिनीचा मोबदला कोटीमध्ये मिळाला. अनायासे मिळालेल्या या पैशाचे काय करायचे, हा प्रश्न सतावत होता. तो पैसा यामध्ये गुंतवण्यामध्ये काही शेतकरीही आघाडीवर आहेत. काही राजकीय मंडळीही यामध्ये गुंतलेली आहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे न्याय मार्गाने परत मिळवून देण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या नावाने पैसे संकलित करून त्यांनी कोठे गुंतवणूक केली आहे ती मालमत्ता जप्त करून वसूल करण्याचा प्रयत्न आहे. सध्या तिघांना शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे भरघोस परतावा देण्याचे आमिष  दाखवून फसवणूक केल्याच्या काही तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी पुढे येउन तक्रारी दाखल कराव्यात . – नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासिक १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगली, मिरज शहरांत अल्पावधीत कोटय़वधींची उलाढाल करणाऱ्या एसएम ग्लोबल, पिनोमिक  ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, पिनोमिक व्हेन्टर्स, व्हेफा मल्टि  ट्रेड, ब्रीट वेल ट्रेडर्स, पुर्वी असोसिएटस, सह्याद्री ट्रेडर्स, शुभ ट्रेडर्स, विश्वास  ट्रेडर्स, निधी कन्सल्टन्सी आदी कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांची रक्कम अडकली आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे लेखी तक्रार करण्यात आली. या कंपन्यांची बँक खात्यावरील उलाढालीची चौकशी केली तर बऱ्याच भानगडी बाहेर येतील.  – नितीन चौगुले, अध्यक्ष युवा शिवप्रतिष्ठान, सांगली