Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. शिवसेनेत गेल्या वर्षी भली मोठी फूट पडली. त्यानंतर यावर्षी २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर, नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकलं आहे की रावणही शिवभक्त होता. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. एक खबरदारी त्यांनी घेतली आहे की त्यांनी आपला धनुष्यबाणही चोरला आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या सगळ्याचे अपडेट्स आपण जाणून घेऊ लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-

Live Updates

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live, Shivaji Park Mumbai | शिवतीर्थावरुन थोड्याच वेळात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ

20:21 (IST) 24 Oct 2023
गद्दारांची खोक्यांची लंका जाळणारच-उद्धव ठाकरे

५७ वर्षे झाली तरीही शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा आपण मोडली नाही. यापुढेही मोडणार नाही. ज्यांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला त्यांना मोडीत काढून आपण पुढे चाललो आहोत. आपला मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकलं आहे की रावणही शिवभक्त आहे. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. एक खबरदारी त्यांनी घेतली आहे की त्यांनी आपला धनुष्यबाणही चोरला आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गद्दारांची खोक्यांची लंका जाळणार

मारुतीरायाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी या गद्दारांची खोक्यांची लंका आहे त्या पेटवणाऱ्या हजारो मशाली आपल्याकडे आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हल्ली एक जाहिरात येते त्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान हे कमला पसंद वाले आहेत. तसं या गद्दारांना कमळा पसंत आहे. आमच्या नादाला आता त्यांनी लागू नये असाही टोला उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

20:03 (IST) 24 Oct 2023
एकनाथ शिंदे म्हणजेच मोठा घोटाळा-संजय राऊत

एकनाथ शिंदे म्हणजेच एक घोटाळा आहे, भाजपाबरोबर जाऊन महाघोटाळा झाला आहे. आता एकनाथ शिंदेंसह ४० भ्रष्टाचाऱ्यांना कधी उलटं लटकवणार? याचं उत्तर हे आता अमित शाह यांनी द्यावं असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

19:53 (IST) 24 Oct 2023
शिंदेंना आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांना मातीत गाडायचं आहे-भास्कर जाधव

“२०२४ च्या निवडणुकीत जनता शिंदेंना धडा शिकवणार आहे. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आपण आलो आहे. ते आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतील यात माझ्या मनात शंका नाही” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

19:24 (IST) 24 Oct 2023
फडणवीसांचा पक्ष इतका मोठा आहे मग ते उचलेगिरी का करतात?-सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार त्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवलं. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? त्यांनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. तुमच्याकडे बोलायला लोकच नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक लोक तुम्ही संपवले आहेत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत? हा माझा त्यांना सवाल आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

19:08 (IST) 24 Oct 2023
या सरकारला कुठलीही लाज उरलेली नाही-अंबादास दानवे

महाराष्ट्रात रोज ७० मुली आणि महिला रोज बेपत्ता होत आहेत. हे लोक बेटी बचावची घोषणा करत आहेत. या सरकारला लाज उरलेली नाही. खासगीकरण केलं जातं आहे. आत्ताचं सरकार हे खोटी आश्वासनं देतं आहे. लोकांना आशेला लावतं आहे. मात्र हे सरकार खोटं आहे. यांनी दिलेली आश्वासनं खोटी आहेत असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

19:01 (IST) 24 Oct 2023
हे सरकार खोटारडं आहे-अंबादास दानवे

सरकार आपल्या दारी आणि मृत्यू येई घरी अशी अवस्था सध्या आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. महाराष्ट्रात औषध खरेदी वर्षभरात झालेली नाही. आता औषध खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. मात्र नव्या वर्षात एक रुपयाचं औषधही खरेदी झालं नाही. महाराष्ट्रात नवं सरकार आल्यापासून किती मृत्यू झाले तुम्हीच बघा. कळवा रुग्णालय, औरंगाबाद, बुलढाणा या ठिकाणी कसे मृत्यू झाले तुम्हाला माहित आहेच असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. डॉक्टर्स उपलब्ध नाही, नर्सेस उपलब्ध नाहीत. खासदार येऊन फक्त नाटक करतो असं म्हणत अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

18:08 (IST) 24 Oct 2023
नवी मुंबईतले कार्यकर्तेही शिवतीर्थावर दाखल

दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना नवी मुंबईतून रवाना झाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटातील हजारोंच्या संख्येने रवाना होण्यास दुपारी ३ नंतरच सुरुवात झाली. अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ऐरोली स्टेशनरून ट्रेनने रवाना झाले. यावेळी निष्ठावंतांचा दसरा मेळावा असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं , तसेच मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली.

17:42 (IST) 24 Oct 2023
काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले आहेत-राजन विचारे

उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी मी शिवसैनिकांसह शिवतीर्थावर जातो आहे असं राजन विचारे यांनी सांगितलं. तसंच काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले आहेत आणि कुणाच्या तरी विचारांचं ओझं घेऊन काम करत आहेत. या लोकांना जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल. सत्याच्या विजय होईल आणि महिषासूरमर्दिनी या राक्षसांचा वध करेल असा विश्वास मला आहे असंही राजन विचारेंनी म्हटलं आहे.

17:33 (IST) 24 Oct 2023
शिवतीर्थ शिवसैनिकांनी फुलून जाणार शिवसैनिकांनी व्यक्त केला विश्वास

संपूर्ण शिवाजी पार्क मैदान हे भरणार आणि सेना भवनापर्यंत आजच्या दसरा मेळाव्याची गर्दी असेल असा विश्वास शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. आज उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आम्ही आलो आहोत असं तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

17:24 (IST) 24 Oct 2023
विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही शिवतीर्थावर- केदार दीघे

ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक तलावपाळी येथील रंगू बापू चौकातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे चालत जाणार आहेत व तिथून रेल्वेने शिवतीर्थाकडे रवाना होणार आहेत.शिवतिर्थावर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी व त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जात असल्याचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी सांगितले.

17:22 (IST) 24 Oct 2023
खऱ्या शिवसेनेचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत, पुरंदरच्या शिवसैनिकांनी मांडलं मत

छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म जिथे झाला त्या भूमीतून आम्ही आलो आहोत. आज आम्ही खऱ्या शिवसेनेचे म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. या ठिकाणी ७० ते ८० हजार लोक आले आहेत. शिंदे गटाचा आजचा दसरा मेळावा हा शेवटचा दसरा मेळावा आहे. कारण सगळा खर्च शासकीय आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला पैसे देऊन लोक आणले जात आहेत असं दादा जिंजुरकर या शिवसैनिकाने म्हटलं आहे.

17:17 (IST) 24 Oct 2023
कोल्हापूरातील शिवसैनिक ढोलकीच्या तालावर भजन गात शिवतीर्थावर दाखल

आमच्या पक्षाचं दैवत बाळासाहेब ठाकरे, तसेच उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी आलो आहोत. कोल्हापूरची जनता असो किंवा महाराष्ट्राची संपूर्ण जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असणार आहे असा निर्धार कोल्हापूरमधून आलेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. शिवसेनेत गेल्या वर्षी भली मोठी फूट पडली. त्यानंतर यावर्षी २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय काय मुद्दे मांडणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.