ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सध्या ठाकरे गटाकडून आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं. सभेसाठी परवानगी नाकारणं हा केविलवाणा प्रकार होता, असंही त्या म्हणाल्या आहेत.

“मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नव्हतं”

“काल माझी सभा नाकारण्याचं कारण मला शेवटपर्यंत कळलं नाही. कारण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार झाला. सभेची वेळ संपेपर्यंत मी हॉटेलमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपाला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होतं की यातून गोंधळ व्हावा, ते मला टाळायचं होतं. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नव्हतं. आपण कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. मी मग हॉटेलमधूनच ऑनलाईन सभा घेतली”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“मी दहशतवादी आहे का?” ५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा संताप

“हा सगळा प्रयत्न केविलवाणा होता. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेवू शकत नाही”, असंही त्या म्हणाल्या.

“महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवेन”

दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून अडथळे आणले गेले, तरी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. “असं सगळं करून मी घाबरेन, असं काही पुढे करणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. बाई समजून हलक्यात घेऊन नका. मी लढणार आहे. मी महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीसांना हे माहिती नव्हतं का?”

यावेळी बोलताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. “गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे कसं करतील? देवेंद्र फडणवीसांना या सगळ्याची कल्पना नसेल का? तुम्ही चिथावणीखोर वक्तव्य म्हणता. प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात. संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांनी पोलिसांना केलेली शिवीगाळ हे सगळं चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही”, असं त्या म्हणाल्या.