सैराटमधील झिंग..झिंग.. झिंगाट या गीताने तरूणाई बेभान होउन नृत्य करू लागते हा सार्वजनिक कार्यक्रमातील नेहमीचा अनुभव. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात या गीतावर नृत्य केले. मात्र, या नृत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि सीतामाईच्या वेशभुषेत अधिकार्यांनी नृत्य केल्याने सांगलीकरांमधून तीव्र प्रतिक्रिया बुधवारी उमटल्या. शिवसेना ठाकरे गटाने याविरूध्द जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली, तर नागरिक जागृती मंचने शिवरायांचा अवमान करणार्यावर कारवाईची मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली.
हेही वाचा >>> तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय-राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप
मंगळवारी जिल्हा परिषदेत कर्मचारी आणि अधिकारी यांचे वार्षिक स्नेह संमेलन साजरे झाले. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्यांनी सिनेगीतावर नृत्य केले. या नृत्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र, एका अतिरिक्त मुख्य कार्यकारी पदावरील ओसवाल नामक अधिकार्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात तर एका महिला अधिकार्यांने सीतामाईच्या वेषात नृत्य केले.
हेही वाचा >>> “मिंध्यांच्या दाढीला खेचून कुठूनही उचलून आणलं असतं”, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले, “वर्षाची माडी…”
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अधिकार्यांच्या नृत्याची चित्रफित गुरूवारी समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि सीतामाईच्या वेषात जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी राष्ट्रपुरूषांच्या आणि देवतेचा अवमान केला असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख शंभोराज काटकर यांनी व्ययत केले. थोर पुरूषांचा अवमान करणार्यावर कारवाई करावी अन्यथा, समाजात चुकीचा संदेश या माध्यमातून जाईल असे नागिरक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेतील बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर राष्ट्रपुरुषांच्या अवामानांचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली व प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील शहरप्रमुख विराज कुठले माजी जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे महिला जिल्हा संघटक मनीषा पाटील यांनी केले.