लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ४० हजार क्युसेक तसेच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक असे मिळून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत वाढला होता. धरणात एकूण पाणीसाठा ११२.६८ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ४९.०२ टीएमसी म्हणजे टक्केवारी ९१.५० एवढी वाढली होती. त्याचवेळी पुण्यातील खडकवासला, बंडगार्डनमार्गे दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

आणखी वाचा-Wife Circulates Intimate Video : पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीने व्हायरल केले खासगी फोटो; तक्रारदार महिला म्हणते, “घरी कोणी नसताना…”

धरणातून भीमा पात्रात ४० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असताना दुसरीकडे धरणावरील जलविद्युत प्रकल्पही सुरू केला जात आहे. त्यासाठी १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा-सीना जोडकालव्यात २०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीत ६१ हजार ९२३ क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. हे पाणी अकलूजजवळील नीरा नृसिंहपूरनजीक भीमा-नीरा नदीच्या संगमात मिसळते. नंतर हे पाणी भीमा नदीवाटे पंढरपूरच्या दिशेने येत आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभाग नदीला पूर येण्याची चिन्हे दिसत आहेत. भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उजनी धरण शंभर टक्के भरत असताना पाणीसाठ्यावरील नियंत्रणासाठी धरणाचे १६ दरवाजे उघडून ४० हजार क्युसेक विसर्गाने भीमेच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. शिवाय धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठीही १६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे.