भंडारदरा परिसरात जलोत्सवाला गहिरे रंग!

मागील दहा दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे .

अकोले : भंडारदराच्या सौंदर्याचे मानबिंदू असणारा ‘अंब्रेला फॉल’ आज अवतरला. जून महिन्यापासून भंडारदरा परिसरात सुरू असणाऱ्या जलोत्सवाला गहिरे रंग प्राप्त झाले.

भंडारदरा परिसराला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे .पावसाळ्यात हा परिसर अधिकच विलोभनीय बनतो .सभोवताली पसरलेल्या सह्यद्रीच्या हिरव्या निळ्या डोंगररांगा,त्यांच्या काळ्याकभिन्न कडय़ांवरून फेसाळत कोसळणाऱ्या लहान मोठय़ा धबधब्यांच्या शुभ्र धवल जलधारा, खळाळत वाहणारे ओढे नाले,तुडुंब भरलेली भातखाचरे, टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊ स,सकाळ संध्याकाळ धुक्यात हरविणाऱ्या डोंगररांगा, या निसर्ग चित्राच्या पार्श्वभूमीवर अथांग जलाशयाला घडविणारी भंडारदरा धरणाची ती काळीशार भिंत. पाहात राहावं असं हे निसर्ग चित्र असते . अंब्रेला फॉल सुरू झाल्यानंतर त्याला अधिकच देखणेपण प्राप्त होते .

भंडारदरा धरणाच्या भिंतीत असणाऱ्या दोनशे फूट उंचीवरील मोरीतून जेव्हा पाणी सोडले जाते तेव्हा तेथे एक विलोभनीय धबधबा तयार होतो .हाच तो प्रसिद्ध अंब्रेला फॉल. दोनशे फूट उंचीवरील मोरीच्या पुढे एक गोलाकार आकाराचा मोठा खडक आहे .मोरीतून वेगाने बाहेर पडणारे पाणी या खडकवरून खाली पडू लागते तेव्हा ते एखाद्य उघडलेल्या छत्रीसारखे दिसते. अंब्रेला फॉल हे भंडारदऱ्याला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.

मागील दहा दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे .त्या मुळे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत असून धरण ८० टक्कय़ांपेक्षा अधिक भरले आहे .जलाशय परिचलन सूचनेनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व मधून ४१३ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला व त्या मुळे अंब्रेला फॉल फेसळत कोसळू लागला . ओव्हरफ्लो कालावधीत हा विसर्ग सुरू राहणार आहे .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Umbrella waterfall in bhandardara overflow bhandardara dam overflow zws