अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वारंवार खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा , यासाठी रायगड जिल्ह्यात ६२१ कोटी ६७ लाख रुपये खर्चुन गावागावांत भूमिगत वीजवाहिनी टाकल्या जाणार आहे. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेतून जिल्ह्यात १ हजार २६४ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युतवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर इतर तालुक्यांतही याबाबत सर्व्हे केला जात आहे.
जागतिक बँककडून भूमिगत वाहिन्यांसाठी अर्थसाह्य मिळत असून, यामध्ये ७५ टक्के जागतिक बैंक आणि २५ टक्के केंद्र सरकारचा बाटा आहे. यातील सर्वात मोठी ७१५ किलोमीटर लांबीची विद्युतवाहिनी श्रीवर्धनमध्ये टाकली जाणार आहे. निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. तब्बल तीन महिने अंधारात राहिलेल्या श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये विद्युतवाहिनीचे जाळे विणण्यासाठी तब्बल २८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेण, मुरूड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि उरण तालुक्यांचा समावेश आहे.
निसर्ग आणि तौक्ते या दोन चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले होते. श्रीवर्धन मधील अनेक गावांना याचा मोठा फटका बसला होता. काही गावात 40 दिवस वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे कोकणातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
योजनेची प्रमुख उद्दिष्टये
वादळ, अतिवृष्टी, पूर यांसारख्या आपत्तींमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवणे विजेचे खांब पडणे, तारा तुटणे आणि वीजपुरवठा खंडित होणे टाळणे.वीज अपघातांचा धोका कमी करणे. विजेच्या तारांचे जाळे जमिनीखाली गेल्याने शहराचे सौंदर्य वाढवणे. वीजचोरी कमी करणे अशी आहेत.
रायगड जिल्हयात पहिल्या टप्प्यात अलिबाग शहर आणि लगतच्या चेंढरे, वरसोली या दोन गावांमध्ये भूमीगत वीजवाहिनी प्रकल्प राबवण्यात आला आहे. अलिबाग-1 आणि अलिबाग-2 अशा दोन टप्प्यात राबवलेल्या योजनेतून १२२ किलोमीटरची विद्युतवाहिनी टाकण्यात आली आहे. जागतिक बँक च्या सहकार्याने ही योजना राबविण्यात आली आहे. ज्यासाठी जवळपास 90 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.योजनेचा मुख्य उद्देश वारंवार वीजपुरवठयात येणारया अडथळयांवर मात करणे हा आहे.
वादळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर जमिनीखालील वाहिन्यांना वारा, पाऊस, झाडे यासारख्या बाह्य घटकांपासून होणारे नुकसान कमी होते, ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो. वादळात उंच उंच झाडे उन्मळून पडल्याने होणारे नुकसान प्रचंड असते. यावर भूमिगत विद्युतवाहिनीने काही प्रमाणात मात करता येईल. – धनराज विक्कड, अधीक्षक अभियंता, महावितरण
विद्युतवाहिनी लांबी (किमी)
पेण – २३.७३, मुरूड – ९८.९५, रोहा – १५, तळा – २२.५०, माणगाव – १२, म्हसळा – २०२, श्रीवर्धन ७१५, महाड – ६१, पोलादपूर – ३०.५०, उरण – ८०.०५ , एकूण – १२४६.२३ किमी