देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. येत्या १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांमधील कित्येक नेत्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये (एनडीएतील घटक पक्षांमध्ये) प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी पक्षावर नाराज असलेल्या काही नेत्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षांकडे वळवला आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी एनडीएतील पक्षांमध्ये प्रवेश केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने, अथवा तिकीट मिळावं या उद्देशाने एनडीएतील पक्षांमधील नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. अशातच भाजपाचा महाराष्ट्रातील एक मोठा नेता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करून मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत. पाटील यांनी काही वेळापूर्वी मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेश पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याचं बोललं जात होतं. पाटील ठाकरे गटात जाणार असल्याच्या वृत्तावर शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु, पाटील यांना जळगावातून ठाकरे गटाच्या तिकीटावर लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे.

सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, उद्या (३ एप्रिल) १२.३० वाजता जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश होईल. खऱ्या शिवसेना परिवारात आपलं मनःपूर्वक स्वागत.

हे ही वाचा >> “१७ रुपयांची साडी वाटून…”, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल; महायुतीतलं वातावरण तापलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार गोडसेंसाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले?

उन्मेश पाटील यांच्याप्रमाणेचे नाशिकचे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसेदेखील पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने त्यांना अद्याप उमेदवारी दिलेली नाही. तसेच निवडणूक तोंडावर आली तर महायुतीने नाशिक लोकसभेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट नाशिमध्ये हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे सध्या एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी संजय राऊत यांना विचारलं की, हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे खुले आहेत का? यावर खासदार संजय राऊत म्हणाले, गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद आहेत.