ऐतिहासिक किल्ले विशाळगड अतिक्रमन मुक्त मोहिमेस गुरुवारी सुरुवात झाली. या मोहिमेचे गड्प्रेमींनी स्वागत केले आहे. विशाळगडावर अनेक वर्षापासून अतिक्रमणे झाली आहेत. यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत संभाजीराजेंनी महाशिवरात्रीच्या अगोदर विशालगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य वन व इतर अधिकाऱ्यांनी अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.
अतिक्रमणे हटली
बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आज जिल्हा प्रशासनाने तात्काळ मोहीम राबवत विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. गडावरील अतिक्रमणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिवभक्तांच्या प्रयत्नांचे हे यश आहे. लवकरच विशाळगड अतिक्रमणासह अवैध धंद्यांच्या विळख्यातून मुक्त होऊ दे, अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य सुखदेव गिरी यांनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.