सातारा: माझे इमान शब्दांशी आणि महाराष्ट्राच्या भूमीशी आहे. दहा हजार पाने लिहिणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाच्या साहित्यसंपदेतील एकही परिच्छेद चोरीचा आहे, असे सिध्द झाल्यास मी त्या क्षणी लेखणी सोडेन, असे आव्हान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सोमवारी दिले. सातारच्या थोरल्या शाहू महाराजांची कर्तृत्व कहाणी वेगळ्या पध्दतीने मांडण्याचा मानस असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.

सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, भगवान वैराट, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत उपस्थित होते.

विश्वास पाटील म्हणाले, की पाटील हे नाव कुस्ती, ऊस किंवा तमाशाच्या फडात रमलेले आढळून येते. परंतु यापैकी मी कुठेही न रमता मी शब्दांच्या फडात रमलो. मला कुठल्या गुरू किंवा ग्रंथाने इतिहास शिकवला नसून महाराष्ट्राच्या मातीतून, दऱ्याखोऱ्यातून अथकपणे प्रवास करत स्थानिकांच्या भेटीगाठीतून, त्यांनी दिलेल्या माहितीतून मी तो शिकलो आहे.

आभासी विद्यापीठाद्वारे समोर आलेला इतिहास, अभ्यास हा कुचकामी असतो. मी वाघ, सिंहांना घाबरत नाही कारण ते समोरून हल्ला करतात. परंतु उंदराची जात हरामी असते. ते गुपचुप कपाटात शिरून लाखोंचे शालू कुरतडतात. अशा वारणेच्या काठावरून आलेल्या अनेक उंदरांनी सध्या उच्छाद मांडला असल्याची टीका त्यांनी केली.

सातारा भूमीच्या दऱ्याडोंगरांमध्ये मोठा इतिहास दडलेला आहे. सातारा जिल्हा मर्दांचा आणि शाहिरांचा प्रांत आहे. या इतिहासाचा मूळ कागदपत्रांसह अभ्यास होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महराज हे धर्माने हिंदू असले तरी महामानव म्हणून मृत्यू पावले. ते सर्व जातीधर्मांचे होते. मराठा अथवा ब्राह्मण जातीने त्यांच्यावर हक्क सांगू नये, असे सांगून पाटील म्हणाले, की साहित्य-कलावंताने जातीवादी असू नये. त्याला जात नसते तर फक्त माणुसकीचा धर्म असतो. तो त्याने शेवटपर्यंत सांभाळला पाहिजे.

साताऱ्याच्या शाहू महाराज यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. त्याच्या शिफारशीनेच पेशवे यांना पंतप्रधानपद दिले गेले. या इतिहासाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. नव्या वाचकांपुढे सत्यता आणताना पानिपतपर्यंतची पेशवाई आणि उत्तर पेशवाई याविषयी प्रकाश टाकला गेला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

यावेळी डॉ. राजा दीक्षित, अण्णा बनसोडे, शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, भगवान वैराट, विनोद कुलकर्णी उपस्थित होते. स्वागत नंदकुमार सावंत, मानपत्राचे वाचन नंदकुमार सावंत, सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.

मदतीवरून राजकीय कोट्या

सातारचे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी पालकांचा हातभार लागणे आवश्यक आहे. त्यामुळेच साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी सढळ हाताने मदत करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्यानंतर शंभुराज देसाई म्हणाले, साताऱ्यात राजे असल्यावर काहीच अडचण येणार नाही. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की माझ्याकडे महत्त्वाचे बांधकाम खाते असले तरी आधीचीच देणी असल्यामुळे निधीची कमतरता आहे. त्यामुळे सध्या तुमच्या खात्याने हात सैल सोडावा, आपण मार्चनंतर तडजोड करू. निधीसंदर्भात दोन मंत्र्यांच्या मिश्किल विधानांवर उपस्थितांमध्ये हशा पिकला.