छत्रपती संभाजीनगर : संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाल्याचे चित्र शनिवारी दिवसभर सर्वत्र होते. आठही जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरू होता. काही क्षणांची विश्रांती आणि सरीवर सर यामुळे पिकांच्या वाढीला हा पाऊस अधिक उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे. गाेदावरी नदीतील आवक वाढल्याने जायकवाडी धरण ८०. ७० टक्क्यांवर गेले आहे. येणारी आवक लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदी पात्रात कोणी जाऊ नये तसेच जनावरांनाही सोडू नये, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी दरम्यान पुलांवरून पाणी जात असल्याने पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा ते पूर्णा हा रस्ता बंद करण्यात आला आहे. अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील नाल्यावर पाणी आल्याने निजामपूर ते बामणी हा मार्ग बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन दिवसांपासून अनेक भागात सूर्यदर्शन झाले नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस येत होता. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड, शेकटा आणि बिडकीन भागात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. वेरूळ येथील लेणीवरचा धबधबाही सुरू झाला.
परभणी जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस सुरू असून शनिवारी पावसाची संततधार सुरू होती. दरम्यान गेल्या आठवड्यात ज्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली त्या मंडळांच्या पंचनाम्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठाच दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची काही ठिकाणी वाहतूक खोळंबली.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात परभणी तालुक्यातील पेडगाव व जांब, पाथरी तालुक्यातील पाथरी, हादगाव व कासापुरी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, चिकलठाणा, मोरेगाव, मानवत तालुक्यातील मानवत महसूल मंडळात व पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, जिंतूर तालुक्यातील बोरी, वाघी धानोरा, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, मानवत तालुक्यातील केकरजवळा या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या भागातील शेतीपिकांचे व नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसानीबाबत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ व एसडीआरएफमधील तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले.
विष्णुपुरीचे दरवाजे उघडण्याची वेळ
दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसाने पाणीच पाणी झाले असून जलाशयांतील साठा झपाट्याने वाढत चालला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ९३.२७ टक्के साठा झाला आहे. पुर्णेचा विसर्ग बंद झाला असला, तरी अन्य ठिकाणांहून आवक सुरूच असेल, तर रात्री विष्णुपुरी प्रकल्पाचा एखादा दरवाजा उघडण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती उपअभियंता अरुण अंकुलवार यांनी दिली. हिमायतनगर, जवळगाव, सरसम (ता. हिमायतनगर) व वाई (ता. माहूर) या चार मंडळांत अतिवृष्टी झाली.
शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी होता. तरीही सर्वदूर १०.६० मि.मी. पाऊस झाला. तर शनिवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता नोंदला गेलेला पाऊस २५.७० मि.मी. एवढा झाला. यावर्षी मुखेड (१९०.६०) आणि देगलूर (१९६.१०) या दोनच तालुक्यात २०० मिमी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक ४९७ मि.मी. पाऊस झाला.
दिग्रस, अंतेश्वर भरणार
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेले अंतेश्वर व दिग्रस हे दोन मध्यम प्रकल्प बंधारे भरून घेण्याचा पाटबंधारे विभागाचा मानस दिसून येतो. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या भागातील आमदुरा व बाभळीचे दरवाजे उघडेच ठेवण्यात आले आहेत. रात्रीपर्यंत विष्णुपुरीमध्ये पाण्याची आवक वाढल्यास किमान एकतरी दरवाजा उघडावा लागेल, अशी शक्यता उपअभियंता अरुण अंकुलवार यांनी स्पष्ट केली.
धारशिव, लातूर, बीड जिल्ह्यातही संततधार
धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. अनेक भागांत पाणी साचल्याने ग्रामीण भागातील रस्तेही बंद झाले आहेत. सकाळी लातूर – अंबाजोगाई रस्त्यावरही मोठा पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओढे नदी, नाले वाहू लागले आहेत.