महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचे वाहन अडवून ठेवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यानी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर रविवारी (२३ जुलै) मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली होती. अमित ठाकरे हे शिर्डीहून मुंबईला येत असताना सिन्नर तालुक्यातील गोंदे टोल नाक्यावर हा प्रकार घडला. या घटनेपासून अमित ठाकरे हे नाव चर्चेत आहे. भाजपाने अमित ठाकरेंवर टीकाही केली होती. आता, त्यावरून राज ठाकरेंनी भाजपालाच प्रतिसवाल केला आहे. आज त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >> “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
“त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही. भाजपाने यावर बोलण्यापेक्षा भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्र करू असं निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं, त्याचं काय झालं हे भाजापने सांगांव. टोल हे जे म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात, तो कोण आहे?”, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
“समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना तिथे फेन्सिंग टाकलेलं नाही. समृद्ध महामार्ग सुरू झाल्यापासून तिथे अपघातात ४०० लोक गेलेत, याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार का? अपघातात माणसं मरतात ही सरकारची जबाबदारी नाही का? लोकांच्या जगण्या-मरण्याची काळजी नाही, पण रस्ता बनवला आहे तर आम्हाला लगेच टोल पाहिजे, लोकं गाड्या चालवतात मरूदेत,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरे यांनी आज (२६ जुलै) यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोल नाक्याच्या तोडफोडीच्या प्रकरणावर भाष्य केलं.