राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र निकाल अद्याप लागलेला नाही. काल ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्यावतीनेही हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावर आज निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाचे कामकाज संपल्याने याप्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

रोहित पवार म्हणतात, “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं.एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.”

हेही वाचा – “राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन…” रोहित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा!

याशिवाय, “या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्हं असावीत?” असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिर्लिंगाबाबत आसाम सरकारच्या दाव्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका –

“भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग सहावं नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यामुळं राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.