सातारा : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अंबादास पवार यांची पत्नी कल्पना पवार यांना राज्य सरकारने थेट पोलीस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) नियुक्ती दिली आहे. तब्बल १७ वर्षांनंतर पवार कुटुंबीयांना शासनाची मदत मिळाली आहे.

मुंबईवरील २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही धारातीर्थी पडले. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, जावलीचे तुकाराम ओंबाळे यांनी अजमल कसाब याला जिवंत पकडले. ओंबाळे यामध्ये शहीद झाले. अंबादास पवार (कवठे, ता. वाई) यांनीही हल्लेखोरांशी दोन हात केले. यामध्ये मुंबई पोलीस अंबादास पवार हे शहीद झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहीद पवार हे मूळचे कवठे येथील आहेत. मुंबई पोलीस झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. अंबादास पवार यांची आई व दोन भाऊ व त्यांचे कुटुंबीय कवठे येथेच वास्तव्य करत आहेत. अंबादास पवार यांची पत्नी व मुलगा हे मुंबईतच आहेत. अंबादास पवार शहीद झाल्यानंतर कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी त्यांची पत्नी कल्पना पवार या प्रयत्न करत होत्या. १७ वर्षांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद अंबादास पवार यांची पत्नी कल्पना पवार यांना थेट डीवायएसपी पदाची नियुक्ती दिली. त्यामुळे कवठे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.