सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मोठ्या आवाजाच्या स्पीकरच्या भिंतीसह निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अभिषेक संगप्पा बिराजदार (वय २८, रा. रेवणसिद्धेश्वर नगर, मोतीबाग, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.

अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मिरवणूक सोहळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या आवाजाच्या स्पीकरच्या भिंतीसह अनेक मिरवणुका निघाल्या होत्या. यातीलच एका मिरवणुकीत अभिषेक बिराजदार सहभागी झाला होता. या मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर त्याला अचानकपणे त्रास जाणवू लागला. यातच तो चक्कर येत रस्त्यावरच पडला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.सर्वच उत्सव, जयंती सोहळ्यांमध्ये सध्या मोठ्या आवाजाच्या भिंतीसह (डॉल्बी) मिरवणुका काढण्याचे प्रकार सर्रासपणे वाढले आहेत. या प्रचंड ध्वनिप्रदूषणाबद्दल कायदे आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आदेशही काढले जातात. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कागदावरच राहते, असा अनुभव अनेकदा येतो. दरम्यान, या ध्वनिप्रदूषणाबद्दल पोलिसांनी एका मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अलिकडे काही महिन्यांपूर्वी देगाव रस्त्यावर एका सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होऊन एका प्रौढ व्यक्तीच्या कर्णदोष होऊन त्याचे कानाचे पडदे फाटले होते.