नांदेड : नांदेड विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील नैसर्गिक आपत्तीच्या गंभीर स्थितीचे भान राखत या विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ-२०२५’ युवक महोत्सव रद्द करावा किंवा पुढे ढकलावा अशा स्वरूपाच्या सूचना लोकप्रतिनिधी तसेच विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्यांनी केल्यानंतरही कुलगुरूंच्या भोवती जमलेल्या मार्गदर्शक मंडळाने नियोजित तारखांनाच हा उत्सवी कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला असल्याची माहिती समोर आली आहे.
‘नांदेडमधील विद्यापीठाचा युवक महोत्सव रद्द करण्याची मागणी’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची विद्यापीठ परिसरात बरीच चर्चा झाली. या विद्यापीठावरील सिनेट सदस्य आमदार राजेश पवार यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा दाखला देत १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणारा युवक महोत्सव स्थगित करावा, अशी मागणी कुलगुरूंना पत्र पाठवून केली होती.
तत्पूर्वी कुलगुरू चासकर यांनी व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला तर तसा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. पण सोमवारी विद्यापीठामध्ये महोत्सवाशी संबंधित मार्गदर्शक मंडळाचे काही सदस्य एकत्र आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा तपशील बाहेर आला नसला, तरी युवक महोत्सव नियोजित तारखांनाच घेण्याचा घाट घातला जात असल्याचे समजले.
युवक महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी विद्यार्थी विकास विभागाकडे असते. या विभागाच्या प्रभारी संचालकपदी काही मंडळींनी देगलूरच्या डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांची वर्णी लावून घेतली. पण ते ज्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांचा धारणाधिकाराचा (लीन) अर्ज मंजूर न केल्यामुळे त्यांना विद्यापीठातील वरील पदाचा कार्यभार घेता आला नव्हता. त्यानंतर कुलगुरूंनी विद्यापीठातील एका प्राध्यापकाकडे वरील पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला; पण विद्यापीठातील एका कंपूने त्यांना विरोध केला. तसेच युवक महोत्सवाशी संबंधित बैठकांवर बहिष्कार घातला. या मानापमान प्रयोगानंतर दुडूकनाळे यांना प्रभारी संचालक करण्यात आले.
युवक महोत्सवाची तयारी करणाऱ्या विभागातच मानापमान प्रयोग झाल्यानंतर ९ ते १२ ऑक्टोबर या तारखांना होणारा युवक महोत्सव तीन दिवस पुढे ढकलावा लागला. याच काळात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार व अन्य संबंधितांनी युवक महोत्सव रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची सूचना कुलगुरूंकडे केली होती. पण आता हा महोत्सव साधेपणाने पार पाडण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. युवक महोत्सवासंबंधी विद्यापीठ बुधवारी अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.
विद्यापीठातील एकंदर कारभार, काही मंडळींनी आणलेले जातीयवादी राजकारण याबद्दल बरीच खदखद निर्माण झाली आहे. शासन आणि राज्यपालांशी संबंधित असलेल्या सूज्ञ मंडळींना कुलगुरूंचा एकंदर कारभार पटलेला नाही, असे दिसून आले. काही मंडळींनी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.