कोल्हापूर : कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आला. अक्षय दीपक चव्हाण (वय २६) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सोमवारी अवघ्या १२ तासांत तीनही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने यश मिळवले आहे.
सिद्धार्थ चौकामध्ये काल रात्री एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून भांडण झाले. त्यातून अज्ञात हल्लेखोरांनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी मयताचा भाऊ दिग्विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित आरोपी यश काळे आणि त्याचे दोन साथीदार यांनी मयताने केलेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शिरोली एमआयडीसी परिसरात तपास करून यश काळे, अमन दानवाडे व श्रीजय बडसकर या तिघांना अटक केली.