सुगरणीच्या रिकाम्या घरटय़ातला तो कावळा कणाकणाने आमच्या नजरेसमोर झिजत होता. पुढचे ४-५ दिवस तो त्या आडोशाखालून हलायलाही तयार नव्हता. लोंबत्या पंखातलं त्राण जाऊन तो पूर्णत: बांधावर पडला. खुजी मान कशीबशी छातीवर टेकलेली होती. अन् अचानक एका सकाळी माझ्यासाठी अनेक अनुत्तरित प्रश्न ठेवून जणू हवेत विरून गेला..

माझ्या घराच्या दोन गच्च्यांपैकी मोठी गच्ची अनेकविध झाडाफुलांनी सजली होती. घराच्या अवतीभोवती मोठी झाडं होती. या झाडांच्या सावल्या गच्चीत पसरलेल्या असत. उन्हाळ्याच्या सुटीत मुलंही या सावल्या पांघरून निद्रेचा आनंद सूर्य माथ्यावर येईपर्यंत घेत. मात्र दुपारी मलूल झालेल्या झाडांना कुरवाळत गच्ची गरम सुस्कारा टाकते. सूर्य कलायला लागताच मात्र गच्ची अभिसारिकेसारखी वाटते. दुधाळ चांदणं  गच्चीचा ताबा घेतं. रातराणी, जाई, जुई, मोगरा यांच्या गंधानं असा रसरशीतपणा गच्चीच्या अंगावर दिसतो की आलेला पाहुणाही त्या धुंदीत न्हाहून निघतो..

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

गच्चीवर काऊचिऊचा घास आणि पाण्याचं भांडं मी नेहमीच भरून ठेवते. सकाळी सकाळी हा ‘चिमणचारा’ खायला कावळ्यांची झुंबड उडते. पोट भरताच आपलं शेणाचं घर बांधायला त्यांची पांगापांग होते ती थेट उन्हं तापल्यावरच परतणं होतं. एकदा मी व माझी मैत्रीण स्वाती आणि माझी मुलगी जयू आम्ही गच्चीत फिरत असताना घराच्या बाजूला बाभळीच्या झाडावर सुगरणीची ३ घरटी वाऱ्यावर झोके घेताना दिसली. खूप दिवसांपासून मला सुगरणीचं रिकामं घरटं हवं होतं. आम्ही तिघी एकटक लावून १५-२० मिनिटं पाहत राहिलो. घरटय़ाजवळ कुणी पक्षी फिरकला नाही. सुगरणीचं घरटं पाहिजे, असा मुलगी हट्ट करू लागली. मग मी वॉचमनला सांगितलं की ही घरटी रिकामी दिसतात, ती घरटी काढून द्या.

वॉचमन काकांनी बाभळीची फांदी वाकवून छोटय़ा फांदीसकट घरटं काढलं. कसलं अप्रतिम विणकाम होतं. गवताच्या काडय़ा एकमेकींत अशा गुंफल्या होत्या की जणू यंत्रावर विणलेली कलाकुसरच! आम्ही तिघी जणी हरखूनच गेलो. घरटं हातात घेतलं तर काय आश्चर्य! एक कावळ्याचं पिल्लू शरीर आक्रसून त्या घरटय़ात बसलं होतं. करवतीनं मधोमध आडवी कापल्यासारखी चोच अन् त्यातून लवलवणारी काळीकुट्ट जीभ, निस्तेज फिस्कारलेला तुटका पंख सावरणंही त्याला अवघड जात असावं. मोडका पाय अन् फाटका पंख घेऊन ते घरटय़ात कसं गेलं, हेच मुळी मोठे आश्चर्य होतं. वॉचमन काकांनी सुगरणीचं घरटं हलवून हलवून कावळ्याचं पिल्लू बाहेर काढलं आणि ते पूर्ण रिकामं असल्याची खात्री करून घेतली. घरटय़ाच्या मध्यभागी बोटभर व्यासाचं छिद्र होतं. त्यातून पक्षीण चोच घालून पिलांना भरवीत असावी. रिकामं घरटं म्हणून बाहेरून फुगीर दिसत असलेल्या भागाला हळूच छेद दिला. घाबरत घाबरत कात्री पुढे सरकवली. कापलेला भाग दोन्ही हातांनी फाडून आत प्रकाशझोत टाकला. आता मात्र त्या घरटय़ात काहीच नव्हतं. मऊ मऊ कापसाचा खोलगट बिछाना, त्यावर दोन पांढुरकी, दोन काळी पिसं. जाळीदार व्हेंटिलेशन, बिछान्यावरून पिलांची चोच छिद्रापर्यंत पोहोचेल एवढीच त्याची खोली. शत्रूला फसविण्यासाठी खालचं बोळकांडं वरून भरीव विणकाम. काय मांडणी होती घरटय़ाची! मी आणि माझी मुलगी त्या घरटय़ाचं इंटेरियर डेकोरेशन पाहून खूश झालो. मुलगी म्हणाली, ‘‘आई, हे सुगरणीचं घरटं इतकं बंदिस्त असताना हे कावळ्याचं पिल्लू कसं घरटय़ात शिरलं? कदाचित कावळ्याला ते रिकामं घरटं दिसलं असेल म्हणून कावळ्यानेच ते पिल्लू घरटय़ात ठेवलं असेल.’’

वॉचमन काकांनी त्या कावळ्याच्या पिलाला गच्चीच्या बांधावर ठेवलं होतं. त्याचे सारेच भाईबंद नित्यकर्मासाठी केव्हाच गेले असावेत. वर सूर्याची पेटलेली होळी, पायाखाली निखाऱ्यासारखा बांध, आक्रसलेलं ते कावळ्याचं पिलू. ठेवलेल्या पाण्याच्या भांडय़ात तुटकी चोच त्यानं बुडवली, पण तेदेखील त्याला अशक्यप्राय होतं. आता थोडीशी चोच बुडवून जीभ ओली करण्याचा त्याचा अविरत यत्न सुरू झाला. आजूबाजूला पसरलेल्या शितांकडे मात्र ते ढुंकूनही बघत नव्हतं. सूर्य मावळतीला झुकताच धडक्या पायावर उडय़ा मारत ते बांधाच्या टोकापर्यंत गेलं. तिथून कसंबसं जवळचं झाड गाठलं. इतर कावळ्यांनी त्याची दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी कोणी दुजा कावळा त्याला काऊचा घास भरवील म्हणून आशेनं त्याच्या आसपास माझी मुलगी घोटाळू लााली, पण त्याचा एकही जातभाई फिरकला नाही. मग, मीच भाताचे गोळे करून बांधावर पसरट भांडय़ात रचून ठेवले. मग ते कसंबसं भाताच्या भांडय़ाजवळ आलं. त्याची तुटकी चोच शिरली, पण चोचीला फक्त शितं चिकटली. समोर अन्नाचा ढीग असूनसुद्धा कावळा उपाशीच. तो मला जवळ येऊ देत नव्हता. बांधावर केलेल्या आडोशाखाली मात्र बसू लागला. त्याला उडणंही अशक्य होतं. कणाकणांनी तो आपल्या नजरेसमोर झिजत होता. त्याच्याइतकीच आम्ही घरातील मंडळी हतबल होतो. पुढचे ४-५ दिवस तो त्या आडोशाखालून हलायलाही तयार नव्हता. लोंबत्या पंखातलं त्राण जाऊन तो पूर्णत: बांधावर पडला. खुजी मान कशीबशी छातीवर टेकलेली होती अन् अचानक एका सकाळी तो जणू हवेत विरून गेला. अगदी दोन्ही गच्च्या आणि घराचा परिसर शोधूनही तो मिळाला नाही. तो बांधावर असताना सुटीवर गेलेले कावळे ८ दिवसांत हजेरी लावू लागले. गच्चीही मोकळेपणाने फुलू लागली, पण माझे काही अवघड प्रश्न कायमच अनुत्तरित राहिले. दोन फुटांचं अंतर ओलांडणं त्या कावळ्याला अवघड होतं. नाहिसा झाला म्हणजे काय झालं? त्यासाठी लागणारं बळ त्याला कुठून मिळालं, कुणाकडे आणि कुणासाठी त्याने झेप घेतली आणि सुगरणीच्या घरटय़ात तो कसा गेला, ही सारी अजूनही मला न सुटलेली कोडी आहेत. आपण सुगरणीच्या घरटय़ातून कावळ्याचं पिलू काढलं आणि ते  गायब झालं, आपल्या हातून अपराध झाला, ही भावनाही त्रास देऊ लागली.

त्या कावळ्याच्या पिलाबद्दल विचार करत असताच एक पारव्यांची जोडी आमच्या गच्चीच्या एका कपारात दिसली. त्यांच्या पंखाखाली तीन छोटी छोटी पिलं च्युक च्युक करत होती. मी दिसताच पारवा मातापित्याचं अस्वस्थ होणं मनाला स्पर्शून गेलं. मादीचं पिलांना भरवणं, चोचीनं पिलांना साफ करणं. तोपर्यंत बापाची जबाबदारी सांभाळत नर पारव्यानं काही तरी चोचीतनं घेऊन येणं. पिलांच्या अवतीभोवती घिरटय़ा घालणं सुरू होतं. त्यांच्या सुखी, आनंदी संसाराचा हेवा वाटावा इतकं लोभस दृश्य! आई पिलांसाठी वज्राहून कठीण बनू शकते. अगदी तसंच जेव्हा मांजर खिडकीवर चढून घरटय़ाकडे बघून पंजे मारू लागली, तेव्हा त्या नर-मादीचं जीव काढून ओरडणं, जणू आक्रोश करून एकमेकांना मदतीसाठी बोलावणं हे हृदयात कालवाकालव करून गेलं. म्हणून लगेचच मी मांजरीला चढता येणाऱ्या वाटा बंद करून टाकल्या. त्याबरोबर नर-मादीचं ओरडणं थांबलं. त्यांच्या जिवात जीव आला असावा.

तीन-चार दिवसांत पिलांनी बऱ्यापैकी बाळसं धरलं होतं. डाळिंबाच्या दाण्यासारखे डोळे आणि त्याचं मान वर करून करून टुकुटुकु  पाहणं अतिशय लोभस वाटत होतं. एकदा असंच माझं घरटय़ाकडे लक्ष गेलं. त्या वेळी तिथं नर-मादी दोघंही नव्हते. पिलांसाठी चारा आणण्यासाठी गेले असावेत कदाचित. त्याचा फायदा घेऊन त्या लोभस गोजिरवाण्या पिलांना पाहण्याचा मोह मला आवरला नाही. मी स्टुलावर चढून उभी राहिले. गच्चीवरील कपारातील म्हणजेच घरटय़ातील पिलं वळवळत, टुकुटुकु बघत होती. उडण्याइतकी, स्वसंरक्षणासाठी मनाची, मेंदूची त्या जिवांची वाढ नव्हती. अजून पंख फुटलेले नव्हते. म्हणून जागीच हालचाल करीत ती तिन्ही पिलं माझ्याकडे बघत एकमेकांआड तोंड खुपसू लागली. संकोचत होती की घाबरत होती हे कळेना. एका मिनिटातच त्यांचं वळवळणं, घाबरणं थांबलं. माझ्यावर विश्वास दाखवत तिघं शांतपणे डोळे मिचकावत बघू लागली. त्यांचं रूप मी डोळ्यात साठवू लागले. तेवढय़ात त्यांचे आई-बाबा तारेवरच येऊन बसले. दोघांचा आवाज वेगळा होता. पिलांबद्दल चिंतेचं बोलणं असावं. त्यांचं शंका-कुशंकांचं, चिंतेचं- काळजीचा सूर असलेलं, ‘गुटर्रगु’ मला समजलं. माझ्यावरचा विश्वास उडू नये म्हणून मी पटकन खाली उतरून त्यांच्या घरटय़ापासून बाजूला झाले. पारव्यांनी पटकन येरझाऱ्या घालत घरटं न्याहाळलं. चोचीत चोच घालून त्यांनी प्रेमाचा, मायेचा वर्षांव केला. पिलांना सुरक्षित बघून त्यांना हायसं वाटलं असावं. माझ्यासमोर काही जीव वाढत होते, मोठे होत होते.. मला समाधान वाटत होतं.

मुलगी म्हणाली, ‘‘आता हे कापलेलं घरटं आणि सुगरणीच्या घरटय़ाच्या विखुरलेल्या काडय़ांचं काय करायचं.’’ फेकून द्यायला मन तयार नव्हतं. मी सुईदोरा घेऊन पुन्हा घरटं मांडीवर घेतलं. मनोमन सुगरणीची आठवण करीत जसं घरटं कापलं तसंच शिवायला सुरुवात केली. उसवलेले धागे दोऱ्यानं शिवून टाकले. एवढय़ा चोचीनं आणि चिमुकल्या पायांनी विणलेलं हे घरटं शिवायला माझ्या दहा बोटांना खूप परिश्रम करावे लागले. सुमारे अध्र्या तासानं तो खोपा शिवायला मला यश मिळालं.  छप्परही जोडून झालं. अतीव समाधानानं मी ते घरटं हॉलमध्ये टांगलं. आणि बहिणाबाईंची कविता गुणगुणू लागले,
अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला।।