सध्या बॉलिवूडमध्ये आलेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेक कलाकार संवेदनशील सीन्स देताना काळजी घेत आहेत. रोज नव्या सेलिब्रेटीचं नाव समोर येत असल्याने अभिनेते बलात्कार, छेडछाडीसारखे सीन देताना पूर्वकाळजी घेत आहेत. नुकतंच प्रसिद्ध अभिनेता दलिप ताहिल यांनी सुधीर मिश्रा यांच्या चित्रपटात बलात्काराचा सीन करण्यास नकार दिला. मात्र जेव्हा त्यांना दिग्दर्शकाने स्क्रिनप्लेच्या दृष्टीने हा सीन खूप महत्त्वाचा असल्याचं पटवून दिलं तेव्हा ते तयार झाले.

मात्र यावेळी त्यांनी एक अट ठेवली ती म्हणजे, शुटिंगच्या आधी आणि नंतर अभिनेत्रीकडून एक पत्र लिहून घेण्यात यावं ज्यामध्ये रेप सीन करताना कोणताही त्रास झाला नाही असं लिहिलेलं असावं. दलिप यांनी यावेळी अजून एका गोष्टीचा खुलासा केला.

दलिप ताहिल यांनी एनबीटीशी केलेल्या बातचीतमध्ये सांगितलं की, ‘आजपासून जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो एक असा काळ होता जेव्हा प्रत्येक चित्रपटात बलात्कार सीन असायचा. त्यावेळी पटकथेवर जास्त लक्ष दिलं जायचं नाही. काही भागांमध्ये असे चित्रपट फार चालायचे. मीदेखील अशाच एका चित्रपटात काम करत होतो’.

‘दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की जेव्हा तो सीन शूट होईल तेव्हा जाऊन बिनधास्त जबरदस्ती करा. मी त्याचं म्हणणं ऐकून आश्चर्यचकित झालो. मी त्याला म्हटलं की, मी एक थिएटर अभिनेता आहे, प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, माझे संस्कार मला असं करण्याची परवानगी देत नाही. यावर दिग्दर्शकाने दलिप भाई हे तुम्ही काय बोलताय ? विचारलं. यावर मी त्याला जे मला सांगितलं तेच हिरोईनसमोर सांग असं सांगितलं असता तो घाबरला. जेव्हा हिरोईनला मी हे सांगितलं तेव्हा ती घाबरलीच. ती रडू लागली आणि तेथून निघून गेली. अर्ध्या तासाने दिग्दर्शकाने माझ्याकडे तुमच्यामुळे शुटिंग बंद झाल्याची तक्रार केली. शेवटी हिरोईनला मनवत आम्ही कसेबसे पुन्हा तिला घेऊन आलो’, असं दलिप ताहिल यांनी सांगितलं आहे.