करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूडला हादरून टाकलं आहे. आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता ललित बहल यांचे निधन झाले आहे. काल २३ एप्रिल रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललित यांच करोनाने निधन झालं आहे.

ललित यांनी तितली आणि मुक्ति भवन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा मुलगा दिग्दर्शक कानु बहल यांनी सांगितले की, ‘ललित हे ७१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यातच त्यांना करोनाचे संक्रमण झाले. त्यानंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.’

कानु पुढे म्हणाले, ‘त्यांना आधीच हृदयाच्या समस्या होत्या. त्यात गेल्या आठवड्यात त्यांना करोनाची लागण झाली. ज्यामुळे त्यांची प्रकृति आणखी बिकट झाली. फुफ्फुसांमध्ये संसर्ग वेगाने पसरत होता, त्यामुळे त्यांचे प्राण वाचवता आले नाही.’

ललित बहल दुरदर्शनच्या ‘तपिश’, ‘आतिश’ सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्माते होते. त्यांनी छोट्या पडद्यावरील ‘अफसाने’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. याशिवाय अॅमेझॉन प्राइमवरील ‘मेड इन हेवन’ आणि कंगनाच्या ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती.