अभिनेता अजय देवगणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून त्यात तो महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. ही व्यक्तीरेखा आहे आर्य चाणक्य यांची. ट्विटरच्या माध्यमातून अजयने या चित्रपटाबाबत माहिती आहे. ‘नीरज पांडे दिग्दर्शित आगामी चित्रपटात भारतीय इतिहासातील महान विचारवंतांपैकी एक अशा चाणक्य यांची भूमिका साकारणार आहे. महान राजकीय विचारक, तत्वज्ञानी, अर्थतज्ज्ञ अशा चाणक्य यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणीवर हा चित्रपट आधारित असेल,’ अशी माहिती अजयने दिली आहे.

‘स्पेशल २६’, ‘अ वेडनस्डे’, ‘बेबी’ आणि ‘रुस्तम’ यांसारख्या दमदार चित्रपटांसाठी दिग्दर्शक नीरज पांडे ओळखला जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यावर आधारित चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच असणार आहेत. यातील इतर भूमिकांविषयी अद्याप फारशी माहिती देण्यात आली नसून ‘रिलायन्स एंटरटेन्मेंट’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

आर्य चाणक्य यांना कौटिल्य देखील म्हटलं जात होतं. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जातं. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.