तीन वर्षांपूर्वी गुरु ग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारसह पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल या तिघांना समन्स पाठवले आहेत. पंजाबच्या फरीदकोटमधील बरगाडी येथील हे प्रकरण आहे. मात्र या प्रकरणी आरोप करणाऱ्यांना आव्हान देत अभिनेता अक्षय कुमारने आपल्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असे म्हटले आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदाच सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले.

अक्षय कुमारने काय म्हटले आहे?

  • मी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात एकदाही गुरुमीत राम रहिम या माणसाला भेटलेलो नाही
  • मी सोशल मीडियावर काही पोस्ट वाचल्या ज्यावरून मला हे समजले की गुरुमीत राम रहीम सिंह जुहू भागात राहतो पण माझी आणि त्या व्यक्तीची कधीही भेट झालेली नाही
  • गेल्या काही वर्षांपासून मी पंजाबची संस्कृती तिथला सुवर्ण इतिहास आणि शिख धर्म त्यामधले संस्कार यांचा आपल्या सिनेमांमधून प्रचार करतो आहे. सिंग इज किंग, केसरी अशा सिनेमांचा त्यात समावेश आहे. केसरी हा सिनेमा बॅटल ऑफ सारागडीवर आधारीत आहे.
  • मला पंजाबी असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि या धर्माचा मी खूप आदर करतो. या धर्माचा अपमान तीळमात्र अपमान मी केलेला नाही. पंजाबी बंधू-भगिनींच्या भावना दुखावल्या जातील असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही असेही अक्षय कुमारने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी माझ्यावर केले आहेत त्यांना मी हे उत्तर दिले आहे. जर माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर ते आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावे असेही आव्हान अक्षय कुमारने दिले आहे.

अक्षय कुमारला २१ नोव्हेंबरला एसआयटी अर्थात विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहायचे आहे. मात्र आपल्यावर झालेले सगळे आरोप खोटे आणि निराधार आहेत असे अक्षय कुमारने म्हटले आहे.