अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिची प्रमुख भूमिका असलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँक कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्थेच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘कल्याण ज्वेलर्स’ला ऑल इंडिया बँकिंग ऑफिर्सकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन हे कल्याण ज्वेलर्सचे सदिच्छादूत आहेत. या ब्रँडची जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. या जाहिरातीत पहिल्यांदाच श्वेता बच्चनदेखील झळकली. मात्र या जाहिरातीवर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आक्षेप घेतला आहे. ‘ही जाहिरात अत्यंत हिन दर्जाची असून यात बँक कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत’ असा आरोप ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर कॉन्फिडरेशनच्या सरचिटणीस सौम्या दत्त यांनी केला आहे. तसेच आता या प्रकरणी कल्याण ज्वेलर्सला कोर्टात खेचण्याचा इशारही देण्यात आला आहे.

मात्र कल्याण ज्वेलर्सनं वरील संघटनेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ही जाहिरात पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता असं उत्तर कल्याण ज्वेलर्सनं दिलं आहे. तसेच तीन दिवसांच्या आत जाहिरातीत डिस्क्लेमर टाकू. ही जाहिरात काल्पनिक असून कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असं जाहिरातीच्या सुरूवातीला आम्ही लिहू असं आश्वासन कल्याण ज्वेलर्सनं दिलं आहे.