वयाची एकाहत्तरी पूर्ण केलेल्या अमिताभ बच्चन यांनी शनिवारी आपला वाढदिवस कुटुंबीयांसमवेत साजरा केला. काही पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पाही मारल्या.  ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात आम्ही कलाकार म्हणून परदेशात जायचो, तेव्हा आमची हेटाळणी केली जायची. आज मात्र आम्हाला तिथे डोक्यावर घेतले जाते. एवढेच नाही तर हॉलीवूडचे निर्माते भारतात येण्यास आणि गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विस्तारलेला हिंदी चित्रपट उद्योग आणि एक सक्षम अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारताची प्रतिमा निर्माण झाल्याने हॉलीवूडला इथली बाजारपेठ खुणावू लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 मागे वळून पाहणे मला अजिबात आवडत नाही. आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि त्यांची शिकवण याच्या जोरावरच मी आतापर्यंत माझी वाटचाल केली. आपण आपल्या आई-वडिलांना जपायला हवे, असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्यातील संवाद वाढत चालला असून त्यामुळेच विविध स्तरांवर प्रगती करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.या वर्षी वाढदिवस आणि करवा चौथ एकत्र आल्याने कुटुंबाबरोबरच पूर्ण दिवस व्यतीत केल्याचेही त्यांनी सांगितले.