मराठीतील प्रतिष्ठित झी गौरव २०२० पुरस्कारांची नामांकनं ६ मार्च २०२० रोजी पार पडली. त्यानंतर करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. पण आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकताना अटीशर्तींसह चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. चित्रीकरणाचे सर्व नियम पाळत झी गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘आटपाडी नाइट्स’ या चित्रपटांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले.

झी गौरव पुरस्काराचं यंदाचं हे २१ व वर्ष. आदिनाथ कोठारे आणि डॉ. निलेश साबळे यांचं खुसखुशीत सूत्रसंचालन, सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्या डान्स परफॉर्मन्सने कार्यक्रमात बहार आणली. यावर्षी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर. तसंच या वर्षीचा मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार ‘तान्हाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना घोषित झाला.

यंदा आनंदी गोपाळ, आटपाडी नाइट्स या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले. आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर यांना ‘खारी बिस्कीट’ आणि आर्यन मेघजीला ‘बाबा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार मिळाला. ललित प्रभार या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सायली संजीवने पटकावला. ‘आटपाडी नाइट्स’ हा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.