चित्ररंग 

प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या साहित्यकृती तसेच नाटकांचे रुपेरी पडद्यावर माध्यमांतर करणे हे मोठे आव्हानच असते. अशा माध्यमांतराचा चित्रपट नुकताच गाजला असून त्यानंतर आता झळकलेल्या ‘नटसम्राट : असा नट होणे नाही’ या चित्रपटातूनही अशा प्रकारचे माध्यमांतर करताना मूळ नाटकाच्या संहितेला धक्का लागू न देता लेखक-दिग्दर्शक आणि कलावंतांबरोबरच चित्रपटाच्या संपूर्ण चमूने पेललेले आव्हान यशस्वी ठरले आहे. मूळ नाटकाशी आणि चित्रपटाची तुलना होणे स्वाभाविक असले आणि हे भान पुरेपूर जपत दिग्दर्शक, लेखक, कलावंत यांनी हा चित्रपट आहे हे ठसविण्यात यश मिळविले आहे. उत्कृष्ट अभिनय, तीस-चाळीस वर्षे रंगभूमीवर एकाहून एक सरस भूमिका साकारणारा नट निवृत्ती जाहीर करतो आणि आता पुढील आयुष्य मुलेबाळे, पत्नी आणि नातवंडे यांच्यासोबत आनंदात घालविण्याचेही जाहीर करतो. अखंड आयुष्य रंगदेवतेचा उपासक म्हणून विविध भूमिका समरसून करणारा हा नटसम्राट कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊ पाहतोय. त्यासाठी घरापासून ते संपत्तीपर्यंत सगळे काही मुलगा आणि मुलगी यांच्यात तो वाटून टाकतो. नट म्हणून रंगभूमीवर मानमरातब मिळविताना, भूमिकांशी एकरूप होण्यासाठी झिजलेला, नाटकात पूर्णपणे रमलेला हा नटसम्राट निवृत्त होतो खरा पण मनाने नाटकातून तो निवृत्त झालेला नाही. मनस्वी आणि काहीसा बेफिकीर स्वभाव मुरलेल्या या नटसम्राटाची उत्तरायुष्यात अपत्यांच्या वाईट वागणुकीमुळे फरफट होते, त्याची अवस्था गलितगात्र, असहाय होते. मात्र तरीसुद्धा त्याचे नाटक सुटत नाही असे कथानक ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या चित्रपटात मांडले आहे.

गणपत बेलवलकर आता नटसम्राट नसून तो एका चहाच्या हॉटेलमध्ये काम करणारा म्हातारा वेटर बनला आहे. इथपासून चित्रपट सुरू होतो आणि फ्लॅशबॅकमधून उलगडत जातो. आता एकटय़ा पडलेल्या आणि अक्षरश: रस्त्याकडेला राहणाऱ्या गणपत बेलवलकरांच्या वाचनात एक बातमी येते. ज्या रंगभूमीवर या नटसम्राटाने असंख्य भूमिका सादर करून गाजवल्या ती रंगभूमी आगीत भस्मसात होते हे वाचून अंतर्बाह्य़ प्रचंड हेलावलेले बेलवलकर त्या नाटय़गृहात जातात आणि तिथून फ्लॅशबॅकमध्ये या नटश्रेष्ठाचा जुना काळ उलगडतो. या प्रसंगामुळे तसेच राम अभ्यंकर हा बेलवलकरांचा जिवलग मित्र व नाटक क्षेत्रातील सहयात्री या भूमिकेतील विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांच्या परस्पर गप्पा-संवादांतून जुना काळ उलगडतो. राम अभ्यंकर  हे बेलवलकरांचे मित्रही आहेत, उत्तम नटही आहेत आणि बेलवलकरांचा प्रत्यक्षात वागण्याबोलण्यातील नाटकीपणा, दंभ यावर टीका करणारेही आहेत. या दोघांच्या मैत्रीचा घट्ट धागा दाखविणारे प्रसंग आणि त्यांच्या परस्पर संवादातून उलगडलेले प्रसंग यातून चित्रपट वेगळी उंची गाठतो.

उत्तम पटकथा-संवाद लेखन आणि दिग्दर्शन तसेच कला दिग्दर्शन, वेशभूषा-रंगभूषा, संगीत, अभिनय याची मिळालेली जोड अशी झकास भट्टी जमल्यामुळे चित्रपट सरस ठरतो. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिकेसाठी निवड योग्यच ठरली असून सुरुवातीपासून शेवटापर्यंत नाना पाटेकरांची छाप चित्रपटभर जाणवते. कावेरी या भूमिकेद्वारे मेधा मांजरेकर यांनी संयत अभिनयाचे दर्शन घडविले आहे. नाना पाटेकर-विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी असे स्वरूप चित्रपटात नसले तरी त्या दोघांतील प्रसंग प्रेक्षकांना खूप भावतात. बेलवलकरांच्या मुलीच्या भूमिकेतील मृण्मयी देशपांडे लक्षात राहते. एकनाथ कदम यांचे कला दिग्दर्शन, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सविता मालपेकर, सारंग साठय़े, तसेच राजा या भूमिकेतील नीलेश दिवेकर यांनीही  भूमिका चोख बजावल्या आहेत.

झी स्टुडिओ प्रस्तुत

नटसम्राट : असा नट होणे नाही

निर्माते – विश्वास जोशी, नाना पाटेकर

दिग्दर्शक – महेश मांजरेकर</p>

कथा – वि. वा. शिरवाडकर

पटकथा – महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे

संवाद – किरण यज्ञोपवित, अभिजीत देशपांडे

छायालेखक – अजित रेड्डी

कला दिग्दर्शक – एकनाथ कदम

संकलक – परेश मांजरेकर

संगीत – अजित परब

कलावंत – नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, विद्या पटवर्धन, सविता मालपेकर, मृण्मयी देशपांडे, नीलेश दिवेकर, नेहा पेंडसे, सुनील बर्वे, जयवंत वाडकर, संदीप पाठक, अजित परब, सारंग साठय़े, प्रांजल परब, सारंग शेटय़े, श्रीधर भावे, श्रीराम पेंडसे, प्रवीण तरडे, नूपुर दुदवडकर, किरण यज्ञोपवित व अन्य.