News Flash

अशोकपर्व

चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय प्रेक्षकांना लागली. यातच त्या चित्रपटांचे यश होते, असे मत अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

सुवर्णमहोत्सवी विनोदजडित

नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमांमधून आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. अभिनयकलेची सतत जोपासना करणारे अशोक सराफ हे चित्रपट/नाटक व्यवसायात ‘अशोक मामा’ म्हणून ओळखले जातात. या ‘अशोकपर्वा’बाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा..

तो विनोदी चित्रपटांचा चांगला काळ होता. तेव्हा तमाशापट, ग्रामीण पाश्र्वभूमीचे चित्रपटही लोकप्रिय होत होते, त्याचवेळी मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांनीही आपली एक जागा निर्माण करायला सुरुवात केली. सामाजिक आशयाला बोलके करणारे असे ते विनोदी चित्रपट होते. गोंधळात गोंधळ चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झाला. मध्ये थोडा काळ गेला, पुन्हा नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटापासून विनोदी चित्रपटांचा काळ सुरू झाला, या आठवणी सांगताना अशोक सराफ रंगून गेले होते. जणू तो काळ त्यांना समोर दिसत होता. ते पुढे म्हणाले, अनेक सुपरहिट चित्रपट आम्ही केले. सचिन, मी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आमचे पूर्ण चित्रपट विनोदी असत. महेश कोठारेसुद्धा त्यावेळी विनोदी भूमिका करत होता. परंतु त्याचे चित्रपट गंभीर असायचे. पण त्या काळातल्या आमच्यासारख्या कलाकारांच्या विनोदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी टिकून राहिली. प्रेक्षकांना चित्रपटगृहात यायला त्या चित्रपटांनी भाग पाडले. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय प्रेक्षकांना लागली. यातच त्या चित्रपटांचे यश होते, असे मत अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

त्या काळात आम्हा कलाकारांमध्ये मैत्रीही होती आणि स्पर्धाही होती, असं ते सांगतात. या दोन्ही गोष्टींना आम्ही कधीच एकमेकांवर कुरघोडी करू दिली नाही. स्पर्धेला स्पर्धेसारखा सामोरा गेलो. आणि इतर वेळी मैत्रीच्या नात्याने चित्रपटसृष्टीतील माझ्या मित्रांशी मी नेहमीच जोडलेला राहिलो. ते नाते कधीच तुटले नाही, असे ते म्हणाले. कामाच्या वेळेला काम आणि चित्रीकरण नसेल तेव्हा एकत्र मिळून मित्रपरिवारात रमलो. त्यामुळे आम्ही सगळे कुटुंबासारखे जोडले गेलो होतो, असे सांगताना आता मात्र काळ बदलला आहे. आता चित्रपटसृष्टीत व्यावसायिकता अधिक आहे. आपापले काम करा आणि निघून जा, अशी परिस्थिती असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त के ली. आजचे कलाकार एकमेकांचे चांगले मित्र असतीलही, पण त्या पद्धतीने त्यांचे एकमेकांना भेटणे होत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये तुटलेपणा जाणवतो, ती हळवी भावना कमी झालीय, असं ते स्पष्टपणे सांगतात. तिन्ही माध्यमात काम करताना अभिनयाची जात एकच असते, पण सादरीकरणात बदल करावा लागतो. ते जमायला हवे. ते ज्ञान आहे. ते अभ्यासाने मी आत्मसात केले असे अशोक सराफ यांनी सांगितले. त्यांच्या अनेक व्यक्तिरेखा नावाने आजही लोकांच्या मनात आहेत. त्याबद्दल बोलताना, माझा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षक मला त्या भूमिकेच्या नावानेच ओळखायचे, हाकही मारायचे.. धनंजय माने, पांडू हवालदार म्हणून. त्यामुळे मी साकारलेली एखादी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती भावली हे लगेच कळायचं, असं त्यांनी सांगितलं. या क्षेत्रात ते अभिनेता म्हणून इतकी र्वष टिकून आहेत. मात्र या क्षेत्रातच काय इतर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला कोणीतरी शिकवण्यापेक्षा तुम्ही स्वत:हून शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण दुसऱ्याने शिकवणे आणि स्वत: शिकणे यात फरक आहे. अभिनेता म्हणून मीच स्वत:ला घडवत गेलो. स्वत: मेहनत घेऊ न शिकण्यावर भर दिला. गोपीनाथ सावकार हे माझे मामा त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो, ते उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेते होते. एखाद्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यावर ते काम करता करता त्यातल्या घटना-प्रसंगांनी तुमच्या आयुष्यावर प्रभाव पडतो आणि तुम्ही घडत जाता, असं ते म्हणाले.

माझ्यासाठी समोर बसलेला प्रेक्षक नेहमी प्रेरणादायी आहे, कारण तोच मला सतत प्रेरणा देतो. व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगवेगळी स्वभाववैशिष्टय़े तशा वेगवेगळ्या भूमिका, ती ऊर्जा अजूनही टिकून आहे, असं ते सांगतात. अभिनयात आपले आदर्श वगैरे कोणी नाहीत, असं ते सांगतात. पण त्या त्या वेळेला काही अभिनेत्यांची कामगिरी अतिशय आवडायची, राजा गोसावी यांच्या सादरीकरणातील सहजता आवडायची. शरद तळवलकर आणि दादा कोंडके यांच्यामुळे अभिनय क्षेत्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीत मी अचानकपणे आलो, असं त्यांनी सांगितलं. दामाद चित्रपटासाठी अमोल पालेकरने माझं नाव सुचवलं. शाहरुखसोबत मी चार चित्रपट केले, त्याच्याविषयी सांगण्यासारखे आहे. कारण तो सतत शिकण्याला महत्त्व देतो. त्याची शोधक वृत्ती आहे. सेटवर तालमीसाठी सदैव तयार असतो, कितीही वेळा तालीम करायला शाहरुखची ना नसते. एखादी गोष्ट जमत नसेल तरी आत्मसात करण्याकडे लक्ष देतो. चारही चित्रपटांमध्ये काम करताना ते जाणवलं, अशी आठवणही अशोक सराफ यांनी सांगितली. चित्रपटांच्या सद्य:स्थितीविषयी ते म्हणाले की, चित्रपटांच्या तंत्रामध्ये काळाप्रमाणे बदल झाला आहे. पण आताच्या सादरीकरणामध्ये कृत्रिमपणा जाणवतो. आधी तसे नव्हते. जे काही असेल ते साधेपणाने, अगदी कसलाही आविर्भाव न आणता पार पडायचे, आता दिसण्याला महत्त्व आले आहे. तांत्रिक बाबींकडे जास्त लक्ष दिले जात आहे.

सर्जनशीलता कमी होते आहे. पूर्वी ९ ते ६ किंवा कधीतरी फारतर रात्री ९ वाजेपर्यंत चित्रीकरण चालायचे, त्याला एक शिस्त होती. पूर्वी सगळ्या गोष्टी साध्यासरळ होत्या. आता तसे नाही राहिले. धावपळ, घाई-गडबड वाढली आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.अलीकडे चित्रपटांना म्हणावे तसे व्यायसायिक यश मिळत नाही. त्याकडे लक्ष देण्याचीही आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. याक्षणी हेच सांगावंसं वाटतं की, अभिनय क्षेत्रात टिकून राहणं महत्त्वाचं आहे. भूमिका मिळत जातात, पण तुम्ही या क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड देता, कसं उभं राहता हे महत्त्वाचं आहे, असं सांगत त्यांनी गप्पा आटोपत्या घेतल्या.

अभिनयच नव्हे तर अन्य कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला कोणीतरी येऊन शिकविण्यापेक्षा तुम्ही स्वत:हून शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण दुसऱ्याने शिकवणे आणि स्वत: शिकणे यात खूप फरक आहे. अभिनेता म्हणून मी स्वत:ला घडवत गेलो. जिद्द आणि मेहनत घेऊन सतत शिकण्यावर भर दिला.

अभिनय क्षेत्रात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. भूमिका काय मिळत जातात. पण तुम्ही या क्षेत्रातील आव्हानांना कसे तोंड देता? त्यावर मात करून कसे उभे राहता? हे खूप महत्त्वाचे आहे. माझ्यासमोर बसलेला प्रेक्षक हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून मला सतत प्रेरणा मिळत असते.

अशोक सराफ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:39 am

Web Title: article about ashok saraf acting career has just completed fifty years
Next Stories
1 तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर शिल्पा शेट्टी म्हणते…
2 वीरमाहदेवी सिनेमाचे पोस्टर फाडून सनी लियोनीचा निषेध
3 नाना पाटेकर अजूनही माझा छळ करतात – तनुश्री दत्ता
Just Now!
X