भक्ती परब

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखनाचीही सुबक हातोटी असलेली सर्जनशील वल्ली म्हणजे महेश मांजरेकर. मनोरंजन क्षेत्रातील नेहमी कार्यरत आणि सतत काहीतरी प्रयोगशील करण्याच्या विचारांनी झपाटलेलं एक धाडसी व्यक्तिमत्त्व. कलाकृतीच्या निर्मितीसाठी मनात भीती असून चालत नाही तर विषयाला थेट  भिडलं पाहिजे, हा त्यांचा बाणा.  चित्रपट, नाटक असो वा दूरचित्रवाणी या तीनही माध्यमात आपल्या बिनधास्त आणि बेधडक शैलीत वावरणारे महेश मांजरेकर नव्या वर्षांत ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. नेटफ्लिक्सच्या ‘सिलेक्शन डे’ या वेबसिरिजमध्येही ते दिसणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधालेला संवाद.

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांसाठी कधी प्रशिक्षकाच्या तर कधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर म्हणतात, माझ्यातही एक शिक्षक दडलेला आहे. मी सेटवर असताना एखादा कलाकार माझ्याकडे आल्यावर मी नक्कीच त्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे सांगतो. कलाकार सेटवर आला की इकडे बघ, तिकडे पाहून संवाद म्हण असं करत त्याला अभिनय शिकवणं, अशी काही दिग्दर्शकांना सवय असते. पण हे करण्यापेक्षा मुळात अभिनय करणं म्हणजे त्या त्या प्रसंगातील परिस्थितीनुरुप व्यक्त होणे हे कोणी सांगतच नाही. कलाकार नेहमी आपण काय करायचं हे बघत असतात. पटकथेचं वाचन करताना कलाकार आपली भूमिका तेवढी वाचत असतात त्यांना हे कळत नाही की दुसऱ्याचीही व्यक्तिरेखा तेवढीच लक्ष देऊन ऐकली पाहिजे. तर त्याला त्याची भूमिका कळेल. तसंच एखादं दृश्य अभिनित करताना समोरच्या अभिनेत्याचे संवाद नीट ऐकले, त्याच्याकडे बघितलं तर आपोआप तुम्हाला काय करायचं आहे, हे समजेल. मग वेगळा अभिनय करावा लागत नाही. ऐकणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं हे अभिनय शाळांमध्येही शिकवलं जाणं आवश्यक आहे. अभिनय करताना साधारणपणे अभिनेता समोरच्या अभिनेत्याच्या ओळी म्हणून झाल्या की नंतर आपण म्हणायचं एवढंच डोक्यात ठेवतो. पण तो काय बोलतोय हे ऐकत नाही. ते ऐकणं फार महत्त्वाचं असते.

नेटफ्लिक्सच्या ‘सिलेक्शन डे’ वेबसिरिजमध्ये ते नामांकित क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. या प्रशिक्षकाच्या आयुष्यात खूप घडामोडी घडतात. त्याच्यावर पैसे खाल्ल्याचाही आरोप होतो. त्यानंतर हा प्रशिक्षक क्रिकेट सोडून देतो. आता तो एका शाळेत कलाशिक्षकाची नोकरी करत असून क्रिकेटशी त्याचे काही देणं घेणं नाही. गंभीर आजाराशी लढणाऱ्या प्रशिक्षकाच्या पत्नीला त्याची काळजी वाटते. त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये जावं असं तिला वाटत असतं. प्रशिक्षक असणाऱ्या या भूमिकेला अनेक पैलू असल्याचे मांजरेकर म्हणाले

मी स्वत: अभिनेत्याच्या भूमिकेत असतो तेव्हा निर्माता-दिग्दर्शक असल्याची भावना बाजूला ठेवून सेटवर पोहोचतो. मुळात मी चांगली भूमिका आणि चांगलं मानधन असेल तरच ते काम स्वीकारतो. माझ्यातील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तीन भूमिकांची अदलाबदल करत नाही. ‘सिलेक्शन डे’मध्ये अभिनेता म्हणून काम केल्यानंतर भविष्यात नेटफ्लिक्सबरोबर निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. ‘सिलेक्शन डे’ ही अरविंद अडिगा यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित वेबसिरिज आहे. ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्यावरील आहे. मराठी साहित्य वेबसिरिजमधून आणण्यावर विचार करायला काही हरकत नाही. पण त्या साहित्याला एक वैश्विक संदर्भ असायला हवा. मराठीतील सरसकट साहित्यावर तसा तोही, पण काही अभिजात साहित्यकृतींचा विचार या माध्यमासाठी नक्कीच करता येईल, असे मांजरेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

काळानुरुप होणाऱ्या माध्यमांतील बदलांविषयी ते म्हणाले वेबसिरिज हे माध्यम भारतात तेवढं लोकप्रिय होणार नाही, असं मानणाराही वर्ग आहे. पण हे भविष्य आहे हे आपल्याला कळत नाही. संकलनाच्या क्षेत्रातही नवे सॉफ्टवेअर आले तेव्हाही असंच बोललं गेलं. पण नंतर आलेल्या ‘फायनल कट प्रो’ ला संकलकांना स्वीकारावंच लागलं. कुठल्याही क्षेत्रात बदल हा आवश्यक आहे आणि तो स्वीकारला पाहिजे. चित्रपट करताना प्रेक्षकांना काय आवडेल हा विचार करावा लागतो, पण वेबसिरिज करताना तुम्हाला त्या विषयाला प्रामाणिक राहून सगळं करावं लागतं, असं मांजरेकर यांनी सांगितलं.

रंगमंचावर सादर झालेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचा निर्माता झालो. त्यावेळी एक माणूस इतक्या व्यक्तिरेखा कशा निर्माण करू शकतो? या विचाराने थक्क झालो होतो. पुलं माणूस म्हणून कसे होते? हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वत:चं आत्मचरित्र लिहिलेले नाही. ‘आहे मनोहर तरी’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मी भारावून गेलो. त्याचवेळी पुलंवर चित्रपट करायचाच हे निश्चित झालं. त्यांनी लिहिलेलं साहित्य अमाप आहे. ते संपूर्ण वाचणं मला शक्य नव्हतं. मग अमोल परचुरे आणि गणेश मतकरी यांनी त्यांची पन्नासेक पुस्तकं वाचली. त्या दोघांच्या संशोधनातून खूप माहिती मिळाली. त्या संशोधनावर शांतपणे विचार केला. या संशोधनातील काय काय घ्यायचं हे ठरवणं खूप आवघड होतं. तरीही त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी एकत्र केल्या आणि मग पटकथेला आकार येऊ  लागला. पटकथा लिहिताना चित्रपटाची लांबी मोठी होणार हे लक्षात आल्यावर चित्रपट दोन भागात प्रदर्शित करायचा निर्णय घेतल्याची माहितीही मांजरेकर यांनी दिली.

पुलंच्या व्यक्तिरेखेसाठी सागर देशमुख आणि ऋषीकेश जोशी ही दोन नावे डोळ्यासमोर होती. रंगभूषाकार  विक्रम गायकवाड यांच्याबरोबर बसून चर्चा केली. सागर देशमुख याला रंगभूषेतून पुलंच्या जवळ नेता येईल असे गायकवाड यांनी सांगितले आणि या भूमिकेसाठी सागरची निवड झाली. इतरही कोणी कलाकार नाही म्हणाले नाहीत. काही कलाकार इतक्या कमी वेळासाठी चित्रपटात आहेत आणि त्यांना संवादही नाहीत, तरीही त्यांनी चित्रपटात काम केले आहे. चित्रपटाची संवाद शैली कशी असावी याविषयी फारसा विचार करावा लागला नाही कारण रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या सर्जनशील लेखकाने ते लिहिले असल्याचे मांजरेकर यांनी सांगितलं.

वेबसिरिज् या माध्यमाचीही वेगळी ताकद आहे. भडक संवाद (शिवीगाळ) आणि अतिरंजित प्रणयदृश्ये दाखवण्याची मोकळीक म्हणजे वेबसिरिज असं काहींना वाटतं. पण ते तसे असता कामा नये. ते तद्दन मूर्खपणाचे आहे. काही वेबसिरिज अतिशय बीभत्स होत्या. अशा माध्यमात वावरताना स्वत: सेन्सॉरशिप मानणं अपेक्षित आहे. काही इंग्रजी वेबसिरिजमध्ये अजिबात प्रणयदृश्ये नव्हती तरी त्या लोकप्रिय झाल्याच. त्यामुळे अतिरंजित काहीतरी मांडण्यासाठी वेबसिरिजकडे कोणी वळू नये.

-महेश मांजरेकर