सध्याचे युग हे जाहिरातींचे आहे. उत्पादनाच्या विक्रीसाठी त्याचे प्रभावी विपणन आणि जाहिरात होणे त्या उत्पादक कंपनीसाठी अत्यंत आवश्यक असते. लोकांच्या मनात आपले उत्पादन ठसावे आणि त्याचा प्रभाव पडावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविल्या जातात. त्यामुळे जाहिरातीला ‘पासष्ठावी कला’ असे म्हटले जात असावे. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या वडिलांबरोबर केलेली जाहिरात सध्या लक्षवेधी ठरली आहे.

बॉलीवूडमधील ‘स्टार’ किंवा क्रिकेटपटू सेलिब्रेटी यांना घेऊन उत्पादक कंपन्या आपल्या जाहिराती करत असतात. अशी दिग्गज मंडळी उत्पादनाच्या जाहिरातीसाठी घेतली की त्याचा त्या उत्पादनाला चांगला फायदा होईल, असा विश्वास त्यांना वाटत असतो. अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी. वडिलांचा बॅडमिंटनचा वारसा तिने पुढे न चालविता तिने वेगळी वाट चोखाळली.

रंग उत्पादक कंपनीच्या एका जाहिरातीत मात्र दीपिका आणि तिचे वडील एकत्र आले आहेत. यापूर्वी दीपिका व तिची आई एका दागिन्यांच्या जाहिरातीत एकत्र आल्या होत्या. वडिलांबरोबर केलेल्या या जाहिरातीमध्ये दीपिका ‘बॅडमिंटन’ या संकल्पनेवर आपल्या मैत्रीणीबरोबर घर सजविताना व रंगविताना दाखविली आहे. रंगविलेल्या एका भींतीवर बॅडमिंटनच्या दोन रॅकेट्स यात दिसतात.

दीपिकाच्या आठवणींचा खजिना असलेली एक डायरी यात पाहायला मिळते. लहानपणच्या या आठवणी आपल्या सतत डोळ्यांसमोर राहाव्यात म्हणून दीपिका घराच्या भिंतीवर वडिलांसोबतची काही छायाचित्रे लावण्याची व्यवस्था करते. तेवढय़ात तिचे वडील साक्षात घरी येतात व तिला आश्चर्याचा धक्का देतात. दीपिका व तिचे वडील स्मरणरंजनात रमून जातात, असे यात दाखविले आहे. दीपिका पदुकोणने यापूर्वी अन्य जाहिरातींत काम केले असले तरी वडिलांबरोबर तिची ही पहिलीच जाहिरात आहे.