मेघना गुलजार दिग्दर्शित ‘तलवार’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय झाला आहे. समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाची उधळण केली आहे. इरफान खान, कोंकणा सेन शर्मा यांच्याबरोबर आणखी एका अभिनेत्याने या चित्रपटात लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते सोहम शहाने. सोहमचा हा पहिलाच चित्रपट नाही. आनंद गांधी दिग्दर्शित ‘शीप ऑफ थीसस’ या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता अशा एकाच वेळी दोन्ही भूमिकांतून त्याने पदार्पण केलं. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला अभिनयासाठी प्रशंसेची पावती मिळवून दिली होती. मात्र, ‘शीप ऑफ थीसस’नंतर अभिनेता म्हणून दुसऱ्यांदा ‘तलवार’सारखा चांगला चित्रपट करायला मिळाल्याबद्दल त्याने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना आनंद व्यक्त केला.

‘तलवार’ हा चित्रपट सत्य घटनेवर बेतलेला आहे. हत्येचा, तपासाचा  सर्वागाने आढावा घेत काही सुटलेल्या गोष्टींवर हा चित्रपट बोट ठेवतो. मेघना गुलजार आणि विशाल भारद्वाज या दोघांनीही चित्रपटासाठी जे संशोधन केलं आहे त्याला तोड नाही. त्यामुळे इतक्या वेळा या घटनेबद्दल लोकांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर अरे! हे आपल्या लक्षातच आलं नाही.. अशी एक भावना त्यांच्या मनात उमटते आणि हेच या चित्रपटाचं यश असल्याचं सोहम म्हणतो. या चित्रपटाची सगळ्या स्तरातून दखल घेतली जाते आहे. अगदी राष्ट्रपतींनी स्वत: हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या चित्रपटाला जी प्रशंसा मिळते आहे त्यामुळे नक्कीच विशालचा हा चित्रपट बनवण्यामागचा जो हेतू होता तो सफल झाला आहे असे आपल्याला वाटत असल्याचेही त्याने सांगितले.

‘शीप ऑफ थीसस’ या पहिल्याच चित्रपटात इतके क ौतुक झाल्यानंतर दुसरा चित्रपट उशिरा येण्यामागचे कारण विचारताच तो म्हणतो की तेव्हापासूनच मी दुसऱ्या चित्रपटालाही सुरुवात केली होती. पण ‘शीप ऑफ थीसस’ आणि ‘तलवार’ या दोन चित्रपटांदरम्यान बराच वेळ गेला आहे हे मीही मान्य करतो. खरं तर, आम्ही लगेचच ‘तुंबाड’ची तयारी सुरू केली होती. ‘तुंबाड’ हा रहस्यमय चित्रपट आहे. पीरिअड ड्रामा आहे. १९२० चा काळ या चित्रपटात असल्याने हा चित्रपट करायला आम्ही खूप वेळ घेतला, असे सोहमने सांगितले. अतिशय वेगळ्या जॉनरचा असा हा चित्रपट पूर्णपणे महाराष्ट्रात सासवडमध्ये चित्रित करण्यात आला असल्याचे त्याने सांगितले. ‘शीप ऑफ थीसस’ या चित्रपटानंतर सोहम शहा आणि आनंद गांधी यांनी ‘रिसायकलवाला प्रॉडक्शन’ ही नवी कंपनी सुरू केली होती. वेगळ्या जॉनरच्या, विषयाच्या चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी हा बॅनर सुरू केला होता. ‘तुंबाड’ची निर्मिती याच बॅनरखाली होत असल्याचे सोहमने सांगितले. सध्या ‘तलवार’ या चित्रपटामुळे एक चांगला चित्रपट कारकिर्दीत जोडला गेला. त्याचबरोबर विशाल भारद्वाज आणि इरफान खानसारख्या सर्जनशील लोकांबरोबर काम करण्याचा अनुभवही मिळाला, याचा जास्त आनंद झाल्याचे तो म्हणतो. मुंबईत अभिनेता म्हणून पाऊल टाकायचं ठरवलं तेव्हापासून या दोघांबरोबर काम करायची इच्छा मनात होती. इतक्या लवकर ही इच्छा पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. पण, ते खुद्द विशाल भारद्वाज यांच्यामुळेच शक्य झाल्याचं त्याने सांगितलं. त्याचे ‘शीप ऑफ थीसस’मधले काम पाहूनच विशाल भारद्वाज यांनी त्याला ‘तलवार’साठी विचारणा केली होती. ‘तलवार’नंतर आता ‘तुंबाड’वर लक्ष कें द्रित करायचे आहे. यशाची हॅट्ट्रिक साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे.