ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं आज (10 जून) निधन झालं. प्रदीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अन् गिरीश कर्नाड यांच्या रुपाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. सर्वच स्थरांतून कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कर्नाड यांच्या संदर्भातील अनेक घटना लोकप्रिय आहेत. अगदी गळ्यात I am also urban naxal अशी पाटी घालण्यापासून ते न पटलेल्या सरकारी धोरणांवर टीका करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी कर्नाड यांनी स्पष्ट मते मांडली. त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणाचे अनेक चाहते होते. ज्येष्ठ रंगकर्मी, कलाकार, दिग्दर्शिका विजया मेहता या देखील कर्नाड यांच्या चाहत्या होत्या. 2013 मध्ये कर्नाड यांच्या आत्मचरित्र प्रकाशनादरम्यान मेहता यांनी कर्नाड यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले होते.
काय म्हणाल्या होत्या मेहता –

आजचा दिवसच मुळी त्यांचा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले जात होते. त्यांच्या साहित्याचे, त्यांच्या दिग्दर्शनाचे, त्यांच्यातील नाटककाराचे, त्यांच्या सामाजिक जाणिवांचे कौतुक करताना सगळ्यांनाच किती बोलू.. असे होत होते. कौतुक करता करता ‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’ असे उद्गार विजया मेहतांच्याही तोंडून अगदी नकळत येऊन गेले आणि ज्यांचे असे भरभरून कौतुक सुरू होते, त्या गिरीश कर्नाड यांनीही विजयाबाईंच्या या वाक्याला स्मितहास्य करत नकळत दाद दिली.

‘खेळता खेळता आयुष्य’ या कर्नाड यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाचा समारंभ इतका रंगला, की उपस्थितांना कधी हे पुस्तक हाती पडते असे झाले. कार्यक्रम संपताच पुस्तक खरेदी करून त्यावर कर्नाड यांची स्वाक्षरी घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, अनुवादिका उमा कुलकर्णी आणि विजया मेहता या तिघांनी आत्मचरित्राच्या निमित्ताने पुस्तकाचे आणि कर्नाड यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले.

हे पुस्तक वाचताना मी वाचकाऐवजी प्रेक्षक बनले. त्या आधी मी त्याने लिहिलेला ‘उणे पुरे शहर एक’ हा प्रयोग पाहिला होता. रंग आणि रचना उधळणाऱ्या एखाद्या शोभादर्शकाची रचना असावी तसा गिरीश कला उधळतो. त्यामुळे एका शहराच्या भावविश्वाचा तो प्रयोग म्हणजे मला शोभादर्शक वाटला. सामान्य वाटणारे; पण प्रयोगात असामान्य होणारे असे हे (कर्नाड) व्यक्तिमत्त्व आहे. तो दिग्दर्शन करतो; पण त्याच्या प्रत्येक रचनेत परफॉर्मरचे स्पंदन असते.. गिरीशच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मला सर्वात महत्त्वाचे वाटले ते त्याचे भारतीयत्वाचे भान. प्रदेश, देश, भाषा, काळ यांच्या सीमेपलीकडे जाऊन कलासंस्कार उभे करण्याची ताकद त्याच्यात आहे आणि ही ताकद निर्माण करायची, तर राजकीय, सामाजिक, नैतिक अधिष्ठान पक्के हवे.. असे सांगताना विजयाबाई क्षणभर थांबल्या आणि पटकन बोलून गेल्या, ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..अशा शब्दात विजयाबाई व्यक्त झाल्या होत्या. गिरीश कर्नाड यांनीही विजयाबाईंच्या या वाक्याला स्मितहास्य करत नकळत दाद दिली होती.