गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची मुलगी योगिता गवळीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. योगिताने अभिनेता अक्षय वाघमारेशी साखरपुडा केला आहे. हा साखरपुडा समारंभ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह एका हॉटेलमध्ये पार पडला असल्याचे वृत्त पुणे टाईम्सने दिले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अक्षय आणि योगिता ऐकमेकांना ओळखत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला होता. ‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. जेव्हा आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाह बंधनात अडकण्याचा सल्ला दिला तेव्हा आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे ही आनंदी आहोत’ असे अक्षय पुणे टाईम्सशी बोलताना म्हणाला.
योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी हजेरी लावली होती. योगिता आणि अक्षयने फेब्रुवारी २०२० मध्ये विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’ या मराठी चित्रपटांत काम केले आहे.