देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतेय. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य सुविधेवरील ताण वाढू लागला आहे. अशा स्थितीत गरिब, श्रीमंत सर्वच स्तरातील नागरिकांना आणि रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही तर काही ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाही. यात आता एका अभिनेत्रीने आपल्या एका जवळच्या व्यक्तीसाठी मदत मागितली आहे.

‘बिग बुल’ फेम अभिनेत्री निकिती दत्ता ट्विटरवर चांगलीच सक्रिय असून करोनाशी संबंधित अनेक पोस्ट ती शेअर करत असते. नुकतीच एक पोस्ट शेअर करत निकिताने एक एका जवळच्या व्यक्तीसाठी मदतची याचना केली आहे. “जुहू क्रिटिकेयर रुग्णालयात माझी एक फ्रेण्ड दाखल असून तिला श्वास घेण्यास त्रास होतोय. दम तोडतेय. लवकरात लवकर मदतीची आवश्यकता आहे. इंजेक्शन आइटोलिजॅक, (100 mg) इंजेक्शन टोउलीजुमाब (400 mg) किंवा इंजेक्शन एक्टेमेरा (400 mg).’ यांची गरज आहे. निकिताच्या या ट्विटनंतर तिला मदत मिळाल्याचं कळतंय. तिने सोशल मीडियावरून काहींचे आभारदेखील मानले आहेत. मात्र मदतीची याचना करणारं ट्विट तिने डिलीट केलंय.

निकिती अभिषेक बच्चनसोबत ‘बिग बुल’ सिनेमात झळकली होती. याशिवाय ती शाहिद कपूर सोबत ‘कबीर सिंह’ आणि अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमातही झळकली होती.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजुंच्या मदतीला पुढे येत आहेत. अभिनेता सोनू सूदसोबतच अनेक जण मदतीचं आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर करत आहेत. त्याचसोबत मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहेत.