बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीस देखील करत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत. आता याप्रकरणी बिहार पोलीस सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती.

दिशा सालियनच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली. सुशांतने आत्महत्येच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी बरेच सिमकार्ड्स बदलले होते. मात्र त्याने वापरलेले हे सिमकार्ड्स त्याच्या नावावर नव्हते. त्यातील एक सिमकार्ड सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीच्या नावावर आहे. सुशांतच्या सर्व कॉल्सचे रेकॉर्ड ट्रॅक करत असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली.

आणखी वाचा : “म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते”; अंकिता लोखंडेने सांगितलं कारण

सुशांत आत्महत्या प्रकरणात पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे बिहार पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी विनय तिवारी बिहारहून मुंबईला येणार आहेत. दरम्यान बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. सुशांतला न्याय देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं ते म्हणाले.