काळवीट शिकार प्रकरणी सुनावणीसाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी (दि.२७) जोधपूरच्या कोर्टात हजर होणार आहे. तत्पूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून चौकशीही सुरु केली आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त डी. सिंह म्हणाले, अशा प्रकारे धमकी देणाऱ्यांमागे कोण आहे हे शोधण्याचे काम आम्ही करीत आहोत. जर ते कोण आहेत हे समजले तर आम्ही योग्य ती कारवाई करु. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल.

सलमान खानच्या फोटोवर लाल मार्करने फुली मारुन तो गॅरी शूटर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला होता. दरम्यान, काही लोकांनी ००७ नावाच्या गटाचा यामागे हात असल्याचा आरोप केला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

काळवीट शिकार प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या इतर कलाकारांविरोधात या महिन्याच्या सुरुवातीला राजस्थान सरकारने राजस्थान हायकोर्टात धाव घेतली होती. केवळ सलमान खान या प्रकरणात दोषी ठरला आहे. त्याला वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता.

सन १९९८ मध्ये आलेल्या ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटींग दरम्यान, या सिनेमातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे हे सर्व या खटल्यात आरोपी होते.