करोना विषाणूचं वाढतं प्रमाण आटोक्यात यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांपासून ते कलाविश्वापर्यंत सारं काही बंद आहे. याचकारणास्तव इतर नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही घरातच आहे.मात्र आता घरात राहून प्रत्येकालाच कंटाळा आला असून अभिनेता अक्षय कुमारने लॉकडाउनची तुलना ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोबरोबर केली आहे. एका रेडिओ इंटरव्ह्युमध्ये तो बोलत होता.

‘न्युज18 ‘च्या वृत्तानुसार, ‘आपण सगळे घरात आहोत. मात्र दररोज भेटणाऱ्या माणसांसोबत भेटून बोलणं वेगळं आणि व्हिडीओ कॉलवर बोलणं वेगळं. त्यामुळे समोरासमोर बोलण्यातची जी मज्जा आहे ती व्हिडीओ कॉलवर नाही. मात्र सध्याच्या काळ बघता आपण घरी राहणंच योग्य आहे.’ असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ‘तुम्ही सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस बघता? सध्या त्या कार्यक्रमासारखी परिस्थिती झाली आहे. देव आता बिग बॉसच्या रुपात आहे. त्यामुळे आपण घरातच रहावं अशी त्याची इच्छा आहे आणि या गेममध्ये तोच जिंकेल जो घरात राहून आपल्या मुलाबाळांना, पत्नीला वेळ देईल. घरात स्वच्छता राखेल आणि आरोग्याची काळजी घेईल. मी सगळ्यांना केवळ एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी घरात रहा आणि आरोग्याची काळजी घ्या’.

दरम्यान, अक्षय कायम अडीअडचणीत असलेल्यांना मदत करत असतो. तसंच देशावर किंवा राज्यावर आलेल्या संकटकाळीही त्याने कायम मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळीदेखील त्याने पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.