‘भाईजान’, ‘दबंग खान’, ‘चुलबूल पांडे’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खानला या कलाविश्वात आता जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून त्याने एक लहान भूमिका साकारली होती. तेव्हापासून आतापर्यंत सलमानचा प्रवास सुरु झाला तो सुरुच आहे. काळासोबतच बदलणाऱ्या या कलाविश्वात विविध भूमिका साकारणारा हा अभिनेता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही समावेश होतो.

सलमाविषयीच्या बऱ्याच चर्चांनीही कलाविश्वात जोर धरल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. मग ते त्याचं खासगी आयुष्य असो किंवा त्याच्याभोवती असणारे वाद असो. प्रत्येक गोष्टीविषयी बऱ्याच चर्चा असतात. याच चर्चांमधील एक भाग म्हणजे सलमानचं मानधन आणि त्याचं वार्षिक उत्पन्न. चित्रपटांमध्ये त्याची आतापर्यंतची कारकीर्द पाहता गेल्या आठ चित्रपटांपैकी त्याच्या अपयशी चित्रपटांची कमाईसुद्धा १०० कोटींच्या घरात आहे. त्याशिवाय त्याच्या एकूण संपत्तीचा आणि लक्झरी कारचा आकडाही थक्क करणारा आहे.

‘फोर्ब्स’च्या यादीतही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमान नवव्या स्थानावर आहे. या यादित नाव समाविष्ट झालं तेव्हा त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा ३ कोटी ८५ लाख डॉलरच्या घरात होता. मुख्य म्हणजे फोर्ब्सच्या यादीत सलमानचं नाव हे गेली बरीच वर्ष पाहायला मिळत आहे. ‘सेलिब्रिटी नेट वर्थ’च्या माहितीनुसार त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा १८.१४ अब्ज रुपयांच्या घरात आहे. हे आकडे ऐकण्यासाठी जितके मोठे वाटत आहेत ते पाहून अनेकांना धक्काच बसला असेल असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

सलमान खान आणि त्याचे चित्रपट गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी कलाविश्वात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनयासोबतच त्याला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम आणि परिणामी त्याच्या चित्रपटांच्या कमाईचे उंचावणारे आकडे ही सर्व गणितं तशी फार रंजक आहेत. अभिनयाव्यतिरिक्त सलमान चित्रपट निर्मितीमध्येही सक्रिय आहे. त्यामुळे त्याच्या व्यवसायांचा व्यासही तितकाच मोठा असल्यामुळे वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीतही तो खऱ्या अर्थाने सुलतान ठरत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.