पडद्यावर खलनायिकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद लॉकडाउनच्या काळात अनेकांसाठी नायक ठरला. करोनामुळे ओढावलेल्या संकटात सोनू सूदने कशाचीही पर्वा न करतात गरजुंच्या मदतीसाठी पुढे आला. अनेकांना रोजगार मिळवून दिला, अनेकांची गावी जाण्याची सोय केली. त्यामुळे आज सोनू सूद हे नाव देशासह विदेशातही लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे त्याची ही समाजसेवा पाहिल्यानंतर तो राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर सोनू सूदने एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’नुसार, “सोनू सूदला राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, एक अभिनेता म्हणून मला खूप काही करायचं आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माझी काही स्वप्न होती. त्यातली काही पूर्ण झाली आहेत, काही बाकी आहेत. त्यामुळे ती आधी पूर्ण करायची आहेत”, असं सोनू सूद म्हणाला.

वाचा :  ‘शेवटी विजय त्याचाच होतो, जो…’; करण जोहरची ‘ही’ पोस्ट होते व्हायरल

पुढे तो म्हणतो, “मी ज्या क्षेत्रात पारंगत आहे.जे काम मी चोख पार पाडू शकतो. तेच काम मी करावं असं मला वाटतं. जर राजकारणात मला एखादी जबाबदारी देण्यात आली आणि मी माझ्या इतर कामांमुळे लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर त्याचा काय उपयोग? सध्या मला एक अभिनेता म्हणूनच खूप काही करायचं आहे.”

वाचा : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मधून सारा अली खान आऊट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. अनेकांचे संसार नव्याने उभे केले. कित्येक जणांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे सोनू सूद हा अनेकांसाठी हिरो ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या ७-८ महिन्यांपासून सोनू सूदने सुरु केलेलं मदतकार्य तो आजही करताना दिसत आहे.