‘दबंग’ आणि ‘दबंग २’ च्या यशानंतर आता सलमान खानचा ‘दबंग ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून अभिनेता सलमान खानने इन्स्टाग्रामवर ते शेअर केलं आहे. त्यासोबतच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

भन्नाट स्टाईल, त्याचा तो दरारा, गावगुंडांना धाकात ठेवण्याची न्यारी पद्धत असणारा चुलबुल पांडे २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पोलिसांची वर्दी घातलेला एक फोटो असून या वर्दीवर छातीजवळ चुलबुल पांडे या नावाचं बॅच लावण्यात आला आहे. वर्दीमधील ही व्यक्ती सलमान खान असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अक्षय कुमार, करिना कपूर यांचा ‘गुड न्युज’ हा चित्रपट देखील डिसेंबर महिन्यात २७ तारखेला प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांच्या तारखांमध्ये केवळ ७ दिवसांचं अंतर आहे. मात्र तरीदेखील ‘दबंग ३’ आणि ‘गुड न्युज’ या चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.