बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन होऊन आता २ वर्ष झाली. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये दुबईमधील एका हॉटेलमध्ये त्यांचं निधन झालं. मात्र त्यांना आजही विसरणं शक्य होतं नाही. त्यामुळेच त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पतीने चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तक प्रकाश सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यातच अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील उपस्थिती दर्शविली होती. यावेळी बोलत असताना तिने तिच्यात आणि श्रीदेवी यांच्यात अखेरचं संभाषण काय होतं हे सांगितलं.

“श्रीदेवी या एक चॅम्पियन होत्या. अनेक वेळा आम्ही एकमेकींशी चांगल्या गप्पा मारायचो. आमची मैत्री इतकी खुललं होती की करिअरवरुन आम्ही आमची पर्सनल लाइफ कधी एकमेकांशी शेअर करायला लागलो हे आमचं आम्हालाच समजलं नाही. २००७ मध्ये मी माझ्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून माझा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या मला मेसेज करुन प्रतिक्रिया देत असतं”, असं दीपिकाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “बऱ्याच वेळा आम्ही घरातल्या गोष्टींवरही चर्चा करायचो. त्या दिवशीदेखील आम्ही असंच घरात काम करणाऱ्या स्टाफविषयी चर्चा करत होतो. घरात काम करणाऱ्या स्टाफला कोणकोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं, यावर आम्ही बोलत होतो आणि बस्स तेच आमचं अखेरचं बोलणं होतं. त्यानंतर आमचं बोलणं झालं नाही. फक्त त्यांचं निधन झाल्याचीच बातमी आली”.

त्या अशा अभिनेत्री होत्या ज्या मला एक अभिनेत्री असण्यासोबतच व्यक्ती म्हणून देखील आवडायच्या. दीपिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर बोनी कपूर यांना अश्रू अनावर झालं आणि ते मंचावरच रडू लागले. त्यानंतर दीपिकाने त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान, श्रीदेवींवर आधारित पुस्तकाचं नाव “श्रीदेवी-द इंटरनल स्क्रीन गॉडेस” असं असून सत्यार्थ नायक यांनी ते लिहीलं आहे.