खऱ्या प्रेमाला वयाची मर्यादा नसते असे म्हणतात. बॉलिवूडमधील दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीकडे पाहिले की हे खरं वाटायला लागते. दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे संसार उघड्यावर पडत असताना या जोडीने आपल्या नात्यातील प्रेम आजही जपले आहे. पण या दोघांच्या आयुष्यात एक उणीव कायमची राहिली. ही उणीव आहे एका मुलाची. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नाही, हे सर्वांनाच माहित आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहित आहे. दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘द सबस्टान्स अँड द शॅडो’मध्ये याबाबत लिहिले आहे. पुस्तकार दिलीप कुमार यांनी म्हटले आहे की, १९७२ मध्ये सायरा पहिल्यांदा गरोदर होत्या. आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सायरा यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यावेळी गर्भाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. पण बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीही आई बनू शकल्या नाहीत.

दिलीप कुमार-सायरा बानो यांची प्रेमकहाणी

साठच्या दशकातील विनोदी अभिनेत्री नसीम बानू यांची कन्या सायरा दिलीप कुमार यांच्या ‘आन’ या चित्रपटातील अभिनयाने प्रभावित झाल्या. दिलीप कुमार यांच्या ब्लॉकबस्टर ‘मुघल-ए-आझम’ च्या प्रिमिअर दरम्यान सायरा यांना दिलीप कुमार यांची अनुपस्थिती चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर सरतेशेवटी सायरा बानू एका मुलाखती दरम्यान दिलीप कुमार यांना भेटल्या होत्या. यावेळी दिलीप कुमार यांनी सायराला सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. सायरांना यावेळी मनात खोलवर दिलीप कुमार यांच्याशीच आपला विवाह होईल असे वाटले होते.

सुरुवातीला सायरा यांच्या भावना दिलीप कुमार समजू शकले नव्हते. एवढेच नव्हे तर बॉलिवूड अथवा इतर क्षेत्रातील कोणत्याही तरुणीपासून हा ‘ट्रॅजेडी किंग’ लांब राहणेच पसंत करत होता. जणू एकटेपणाणे जगण्यावरच त्यांचे प्रेम होते.

लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायरा बानो यांनी १९६१मध्ये शम्मी कपूर यांच्या ‘जंगली’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनय तर बहाणा होता दिलीप कुमार यांच्या जवळ येण्याचा. सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केले, तेव्हा त्या त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षे इतके होते. आधी दिलीप साहेब तयार नव्हते, पण नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला. 1966 साली दोघांचे लग्न झाले. गेल्या काही काळापासून दिलीप कुमार आजारी आहेत. सायरा बानो त्यांची देखभाल करत आहेत. त्या एखाद्या सावलीप्रमाणे कायम त्यांच्यासोबत असतात. दोघांच्या वयातील अंतरामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकू शकणार नाही अशा चर्चा देखील तेव्हा रंगल्या होत्या. पण या जोडीने या सर्व चर्चा आजच्या घडीपर्यंत खोट्या ठरविल्या आहेत.